पवार कुठेही जाऊन लढतात, बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाके
पुणे (बारामती ) : जर पवार फॅमिली महाराष्ट्रात कुठेही जाऊन उभं राहत असेल तर मी कुठेही उभं राहू शकतो. बारामतीच्या जनतेनं आग्रह केल्यास बारामती विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत दिले जात असतानाच दुसरीकडे बारामतीत पवारांच्या विरोधात बारामती विकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय ओबीसी नेतेलक्ष्मण हाके यांनी जाहीर केला आहे.
गेले कित्येक वर्ष बारामतीतली सत्ता पवारांच्या हातात असताना देखील तालुक्याच्या जिरायती भागात अद्याप देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील त्यांना सोडवता आला नाही. पवारांना आता सर्व लोकांनी ओळखलेय त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड सह सर्व महानगरपालिकातून पवार जवळपास सत्तेबाहेर झालेत. अजित पवार पहाटे उठून पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि बारामती मध्येच का जातात बाकी कडे का जात नाहीत असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला. अजित पवार पहाटे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सांगली महापालिकेत, परभणीच्या महापालिकेत, चंद्रपूरच्या महापालिकेत पहाटे जाऊन विकास बघितलाय का असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. पिंपरी चिंचवड, पुणे महापालिका यांनी जहागीर समजली होती, त्या लोकांनी यांना कात्रजचा घाट दाखवला, असं हाके यांनी म्हटलं आहे.
ठाकरेंनी महाराष्ट्राची अब्रू वाचवली
ठाकरेंनी महाराष्ट्राची अब्रू वाचवली, माझं आणि त्यांचं लई जमतं म्हणून नाही बोलत,ठाकरेंना जनतेनं दाद दिली. संघर्ष करणाऱ्या लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी सर्वसामान्य माणूस आहे, हे मुंबईच्या जनतेनं दाखवलं. तुम्ही (पवार) एकदा भाजपच्या बाजूला, एकदा याच्या बाजूला, एकदा त्याच्या बाजूला, काय चाललंय नक्की, म्हणून पवार कुटुंबावर बोलतो, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
भाजपच्या नेत्यांना आता उतरती कळा लागली आहे, मूळचे नेते बाजूला राहिले असल्यास देखील लक्ष्मण हाके यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच प्रकाश शेंडगे आणि काँग्रेस यांच्या युती बाबत चर्चेवर देखील त्यांनी निशाणा साधला. या निवडणुकीत ओबीसि बांधवांना सोबत घेऊन पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार असल्याचं हाके यांनी म्हटलंय.
बारामतीच्या दुष्काळी भागात 25 ते 30 गावं आहेत, त्या गावातील जनतेला पिण्याचं पाणी मिळू शकत नाही, हे पाहायला येतोय. बारामतीचा विकास पाहायला बारामतीला येतो, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.
आम्ही सामाजिक आंदोलन करणारी माणसं आहोत,राजकारण करायला आमच्याकडे कारखाना नाही. आमच्याकडे पार्थ पवारांप्रमाणं दारुची फॅक्टरी नाही. आमच्याकडे दादांप्रमाणं अर्थखातं नाही. सर्वसामान्यांचा आवाज बनणं हे आंदोलक म्हणून आमचं काम आहे.
पवार सत्तेत आहेत, म्हणून त्यांच्या विरोधात बोलत आहे. राज्यसभेची सीट देखील तुम्हाला पाहिजे, जिल्हा परिषदेला युगेंद्र पवारांना उभं करणार असल्याचं ऐकलेय. महाराष्ट्रातील 10 गेल्या तरी चालतील यांना अडवलं पाहिजे. लोकशाही इथल्या लोकांना कळली नाही. आम्ही फक्त मतदान द्यायला जन्म घेतलाय, एवढीच लोकशाही लोकांना कळालीय, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
तुम्ही सत्तेत आहात की विरोधात आहात हे एकदा पवारांनी महाराष्ट्राला सांगावं, असं लक्ष्मण हाके म्हणाले. फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा नेता व्हायचंय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भाजपबरोबर जाऊन हजारो कोटींची, लाखो कोटींची डील, आपली प्रकरणं यासाठी कॉम्प्रमाईज करायचं आहे. यांची थेट डील अमित शाह, नरेंद्र मोदींसोबत असते, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.