Dhananjay Munde Resigned : धनंजय मुंंडे यांचा राजीनामा, मंत्रिपदावरुन पायउतार ABP MAJHA
Dhananjay Munde Resigned : धनंजय मुंंडे यांचा राजीनामा, मंत्रिपदावरुन पायउतार ABP MAJHA
धनंजय मुंडे राजीनामा मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resign) यांनी आज (4 मार्च) अखेर राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. बीडच्या मस्साजोगमधील (Beed Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh case) हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते.
9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती. धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्यांचा राईट हँड अशी ख्याती असलेला वाल्मिक कराड या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आरोप झाले होते. सुरुवातीला बीड पोलिसांनी याप्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड कुचराई केली होती. अखेर याप्रकरणावरुन प्रचंड रोष निर्माण होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीआयडी आणि एसआयटीने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला होता. यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे सीआयडीने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. नुकतेच याप्रकरणात 1500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते.
Comments are closed.