महायुतीपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान, मनधरणीसाठी नेत्यांच्या बैठका आणि फोनफोनी
विधान परिषद निवडणुकीचे जागावाटप आणि उमेदवारीवरून महायुतीत स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात धुसफुस सुरू आहे. रायगड, पुणे, सोलापूर, नाशिक, जळगाव, भंडारा-गोंदिया, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या मतदारसंघांत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकवल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान तिन्ही पक्षांच्या नेत्यांपुढे असून बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी बैठका आणि फोनफोनी करून समजुतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
निवडणूक होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची आकडेवारी पाहता महायुती वरचढ असल्याचे दिसत आहे. मात्र, महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये उमेदवारीवरून असंतोष उफाळून आला असून, निवडणूक होत असलेल्या 17पैकी जवळपास 12 मतदारसंघांत स्थानिक प्रभावशाली नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंड पुकारले आहे. यामुळे एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. पक्षनेतृत्वाला बंडखोरांची मनधरणी करण्यात कितपत यश येते यावर महायुतीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
रवींद्र चव्हाण-सुनील तटकरेंची बैठक
बंडखोरी मोडीत काढून निवडणूक सुरळीत पार पाडण्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. यानंतर बोलताना तटकरे यांनी 17 जागांवर सामंजस्य करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. मला विश्वास आहे, निवडणुका सुरळीत पार पडतील. एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा झाली असून रायगडमध्ये दळवींच्या उमेदवारीबाबत योग्य मार्ग निघेल. असे ते म्हणाले.
अर्ज मागे न घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई
महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱया भाजप आणि अजितदादा गटाच्या उमेदवारांशी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडून संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज मागे न घेतल्यास पक्षातर्फे शिस्तभंगाच्या कारवाई करण्यात येईल, असा इशारा संबंधितांना देण्यात आला आहे.
महामंडळाचे गाजर
महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणाऱया उमेदवारामुळे ज्या ठिकाणी मोठा फटका बसण्याची शक्यता असणाऱया ठिकाणी महामंडळाचे गाजर दाखवून माघारीसाठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. पुण्यात अजित पवार गटाला सुनील टिंगरे यांची समजूत काढण्यात यश आले आहे.
सोलापुरात काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान अवैध ठरवून बाद करण्यात आला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कायदेशीर पडताळणीनंतर हा निर्णय दिला आहे. काँग्रेसकडून सूचक म्हणून अर्ज केलेल्या व्यक्तीनेच घेतलेल्या हरकतीमुळे ही नामुष्की ओढावली आहे.
या ठिकाणी दोस्तीत कुस्ती
- रायगड – अनिकेत तटकरे (अजितदादा गट) विरुद्ध जुईली दळवी (शिंदे गट)
- पुणे – विक्रम काकडे (अजितदादा गट) विरुद्ध सुनील टिंगरे (अजितदादा गट), प्रदीप कंद (भाजप)
- सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध रमेश बारसकर (शिंदे गट)
- नाशिक – नरेंद्र दराडे (शिंदे गट) विरुद्ध गोकुळ गिते, गणेश गिते (भाजप)
- जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध रेश्मा काळे, दीपक धांडे (शिंदे गट)
- भंडारा – अविनाश ब्राम्हणकर (भाजप) विरुद्ध नरेश ईश्वरकर, अभिषेक कारेमोरे (अजितदादा गट), सचिन कुंभलकर (भाजप)
- यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिंदे गट) विरुद्ध नितीन भुतडा (भाजप), साजिद बेग (अजितदादा गट)
- अमरावती – प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध विपल्व बाजोरीया (शिंदे गट)
- चंद्रपूर – अरुण लखाणी (भाजप) विरुद्ध सुधीर कोठारी (अजितदादा गट)
- परभणी – सईद खान (शिंदे गट) विरुद्ध विजय जामकर, संग्राम जामकर (अजितदादा गट)
- छत्रपती संभाजीनगर – सुहास शिरसाठ (भाजप) विरुद्ध समीर सत्तार (शिंदे गट)
- नांदेड – अमरनाथ राजूरकर (भाजप) विरुद्ध प्रवीण पाटील चिखलीकर (अजितदादा गट)
Comments are closed.