‘गोगावलेंवर सातत्याने अन्याय..’, शिवसेनेच्या आमदाराचा महायुतीवर निशाणा, आम्ही अन्यायाविरुद्ध ल
रायगड: रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यातील संघर्ष कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे. आता 1 मे महाराष्ट्र दिनाला होणाऱ्या ध्वजारोहणाचा मान देखील अदिती तटकरे यांना मिळाल्याने शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी चांगलेच संतापले आहेत. ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना मिळाल्याचा संताप व्यक्त करत त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. आमच्या उठावाचा त्यांना कदाचित विसर पडलाय का? आमचा रायगड पॅटर्न उठाव संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं आहे. त्यामुळे मी रायगडच्या मुख्यालयातील आमदार असल्याने मंत्री अदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदावर स्थगिती असताना सुद्धा असा अधिकार शासनाने देऊ नये असा इशारा सुद्धा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
रायगडमध्ये आमचे सेनेचे तीन आमदार असताना जनतेने आम्हाला दिलेला जनाधार हा आमचा हक्क आहे. मात्र, तसं असताना सुद्धा हा घेण्यात आलेला निर्णय चुकीचा असून याचा मी निषेध करतो, असा राग त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सुनिल तटकरे यांनी खरं तर आमच्यासाठी मोठं मन करायला हवं होतं. त्यांनी रायगड जिल्ह्याला ज्यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला त्या भरत गोगावले यांच्याकरिता रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिफारस पत्र करायला हवं होतं. मात्र, तसं न करता तटकरेंनी आपल्याच घरात हे पद घेतलं, असं वक्तव्य आमदार दळवी यांनी केलं आहे. त्यामुळे आमच्या कार्यकारणीची बैठक घेऊन यावर योग्य निर्णय घेऊ आणि उद्याच्या महाराष्ट्र दिनाला मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यास त्याला कशा पद्धतीने विरोध करायचा ते आम्ही निश्चित करू असा इशारा सुध्दा आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांना दिला आहे
पालकमंत्री भरत शेठच व्हावे संपूर्ण रायगडची इच्छा : महेंद्र दळवी
आमदार महेंद्र दळवी यांनी आधी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, मध्यंतरी आदित्य तटकरे यांच्या पदाला स्थगिती दिली होती. आम्ही उठाव केला होता त्यामुळे स्थगिती दिली. भरत शेठच्या रूपाने पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे. त्यांना ध्वजारोहणाचा मान मिळणं हे योग्य नाही. कुठेतरी आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही उद्या रायगड कार्यकारिणीची बैठक लावली आहे. माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, एकदाचा पालकमंत्रीपदाचा निर्णय घ्या. रायगडवर अन्याय का? उद्या कार्यकारिणीची बैठक घेऊन एक तारखेला याचा नक्कीच विरोध करणार आहोत. जनतेने आम्हाला जनाधार दिला आहे. संपूर्ण रायगडची इच्छा आहे की, पालकमंत्री भरत शेठच व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि रायगडच्या लोकांची भूमिका त्यांच्यापुढे मांडणार आहे. मला विश्वास आहे की, वरिष्ठ पातळीवरून भरत गोगावले यांना पालकमंत्री घोषित केले जाईल. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला आमचा विरोध राहणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
पालकमंत्रीपदाचा वाद सुरूच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार, नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती. मात्र, या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरून टायर जाळत रास्ता रोको आंदोलन केले. त्याचप्रमाणे, नाशिकमध्येही मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या 24 तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत घेतलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. महायुतीत अजूनही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असून महाराष्ट्र दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावरून रायगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. अद्यापही या दोन ठिकाणचा पालकमंत्रीपदाचा वाद सुरूच असल्याचं दिसून येत आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.