महेश कोठारेंनी अपघातप्रकरणात सुनबाईला वाचवण्यासाठी भाजपवर…. किशोरी पेडणेकरांचा आरोप


महेश कोठारे आणि उर्मिला कोठारे: भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2026) मुंबईत भाजपचं कमळ फुलेल, असा विश्वास व्यक्त करणारे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे हे सध्या ठाकरे गटाच्या रडारवर आहेत. कालच संजय राऊत यांनी महेश कोठारे (Mahesh Kothare) यांना टोला लगावला होता. यानंतर आज ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महेश कोठारे यांच्यावर एक गंभीर आरोप केला. महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे (Urmila Kothare) ही एका अपघात प्रकरणात अडकली आहे. त्यामधून तिला वाचवण्यासाठीच महेश कोठारे यांनी भाजपची (BJP) स्तुती केल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. त्या बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी त्यांनी महेश कोठारे यांना लक्ष्य करताना म्हटले की, ते कलाकार आहेत, ही खरी गोष्ट आहे. पण त्यांच्या सुनबाई अडकल्यात एका अपघात प्रकरणात. तिला कसं वाचवायचं, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. भाजपवर अशी मुक्ताफळं उधळल्याशिवाय ही गोष्ट साध्य होणार नाही. महाराष्ट्रात जी एक संस्कृती तयार होतोय, मी नाव नाही घेणार, मला कुठल्याही जातीचा अपमान नाही करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं, पण त्यासोबत क्रौर्यही दाखवलं, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर आता महेश कोठारे आणि भाजपचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहावे लागेल.

Urmila Kothare Accident: उर्मिला कोठारे अपघात प्रकरण नेमकं काय?

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाला होता. ठाणे-घोडबंदर रस्त्यावर मध्यरात्री 12.54 च्या सुमारास हा अपघात झाला होता. त्यावेळी उर्मिला कोठारे ही आपल्या मैत्रिणीला भेटून तिच्या घरी जात होती. यावेळी तिचा चालक गजानन पाल हा कार चालवत होता. कांदिवली पोईसर मेट्रो स्थानकाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. या अनियंत्रित कारने मेट्रो स्थानकाजवळ काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले. त्यानंतर कार बॅरिकेटला जाऊन धडकली होती. या अपघातामध्ये सम्राटदास जितेंद्र या मजुराचा मृत्यू झाला होता. तर उर्मिला कोठारे ही अपघातात जखमी झाली होती. तिलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अपघाताच्यावेळी चालक गजानन पाल गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली होती. तो गाडी चालवताना दारुच्या नशेत होता का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुनेही घेतले होते. तेव्हापासून याप्रकरणात नक्की काय घडलं, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Mahesh Kothare: महेश कोठारे नेमकं काय म्हणाले?

महेश कोठारे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मागाठाणे परिसरात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केलेले एक वक्तव्य प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. भाजप म्हणजे आपले घर आहे. मी स्वत: भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून आणायचा आहे. तसेच यावेळी महापौरही इथून निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. मी जेव्हा पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की, येथील मतदार हे खासदार निवडून देत नाहीत तर केंद्रीय मंत्री म्हणून निवडून येत आहेत. आताही आपण या विभागातून फक्त नगरसेवक निवडून देणार नाही. तर भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची ठरवली तर उद्या या विभागातून मुंबईचा महापौर निवडला जाईल, असे महेश कोठारे यांनी म्हटले होते. महेश कोठारे यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

आणखी वाचा

संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारे खो-खो हसत सुटले, म्हणाले, ‘मला माझं मत मांडण्याचं व्यक्तीस्वातंत्र्य आहे’

आणखी वाचा

Comments are closed.