मी मूळचा भाजपचा, स्वतःच्या जीवावर निवडून आलोय, महेश शिंदेंचं शंभुराज देसाईंना प्रत्युत्तर

सातारा : मी आणि माझ्या कुटुंबाने भाजपसाठी काम केलं आहे, 2019 साली कोरेगावची जागा शिवसेनेला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला उद्धव ठाकरेंकडे पाठवलं आणि अपघाताने आपण शिवसेनेत गेलो असं वक्तव्य आमदार महेश शिंदे यांनी केलं. जिल्ह्यात शिवसैनिक राहिला आहे का असा सवाल करत आपण स्वतःच्या जीवावर निवडून आल्याचा दावाही महेश शिंदे यांनी केला.

साताऱ्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आज प्रथमच जाहीर प्रतिक्रिया देत शिवसेना आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यातील कार्यक्रमाला आपल्याला बोलावलंच नाही, फोनही आलेला नाही, असा दावा महेश शिंदे यांनी केला. या आधीही असे अनेकदा घडले आहे, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवर नसतात, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे, असा सवाल करत स्थानिक नेतृत्वालाही टोला लगावला.

मी मूळचा भाजपचा, महेश शिंदेंचं वक्तव्य

महेश शिंदे म्हणाले की, “माझी पत्नी शिवसेनेतून निवडून आली आणि भाजपमधून अध्यक्ष झाली असं घडलं नाही. माझी पत्नी ही पहिल्यापासून भाजपचं काम करते, आमचं अख्खं कुटुंब भाजपचं काम करते. मी मूळचा भाजपचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. 2011 साली साताऱ्यात कुणीही भाजपचं काम करत नव्हतं तेव्हापासून मी काम करत होतो. त्यावेळी बूथ सदस्यापासून कमिटी स्थापन केली. 2011 ते 2019 कोरेगाव विधानसभा प्रमुख म्हणून काम केलं पण 2019 साली कोरेगावची जागा ही शिवसेनेकडे गेल्यानंतर अपघाताने मी तिकडे गेलो. मी स्वतःच्या जीवावर निवडून आलोय. मला कुणी त्रास द्यायचं कारण नाही. पण माझे शिंदे साहेबांसोबत चांगले संबंध आहेत, त्यामुळे काही अडचण नाही.”

महेश शिंदे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी आम्ही शिंदे साहेबांसोबत गेल्यानंतर आम्हालाही व्हिप बजावला होता. पण आम्ही भाजपसोबत निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं होतं. आपल्याकडे संख्या किती हे महत्त्वाचं आहे. आज भाजपचं संख्याबळ हे 35 चे आहे.आताही दोन सदस्यांनी आमच्यासोबत निवडून आल्याने आम्हाला मतदान केलं. त्यामुळे त्यांना व्हिप बजावला असला तरी काही फरक पडत नाही.”

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी भाजपसोबतच्या युतीबाबत मी एकनाथ शिंदे यांना पूर्वकल्पना दिली होती. त्यावेळी मला सांगितलं होतं की शिंदे साहेबांचा निरोप येईल. ज्यावेळी मला साहेबांचा निरोप येईल त्यावेळी मी त्यांच्याकडे जाईन आणि भूमिका मांडेन, असं महेश शिंदे यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.