हिंदीनंतर इंग्रजी पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला! ‘एनसीईआरटी’विरोधात साताऱ्यात शिवप्रेमींचा भव्य मोर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग’ने हिंदीनंतर इंग्रजीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा आठवीच्या पुस्तकातील नकाशा हटवला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमधून प्रचंड संताप व्यक्त होत असून ‘एनसीईआरटी’चा निषेधार्थ आज साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

‘एनसीईआरटी’ने याआधी हिंदीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवला होता. सरकारच्या या धोरणाविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी यासंदर्भात ‘एनसीईआरटी’सोबत पत्रव्यवहार करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन विधिमंडळात दिले होते. मात्र ‘एनसीईआरटी’ने याची कोणतीही दखल घेतली नाही. तर आता इंग्रजी भाषेतील पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला आहे.

…तर महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवणाऱ्या ‘एनसीईआरटी’ने तातडीने नकाशाचा समावेश आठवीच्या पुस्तकात करावा यासाठी साताऱ्यात श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. याबाबत तातडीने कार्यवाही केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, मराठा साम्राज्याचे ऐतिहासिक अस्तित्व पुसून टाकण्यासाठी नकाशा हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Comments are closed.