महाराष्ट्र दिनापासून मराठी सक्ती; टॅक्सी-रिक्षा चालकांना धडे देणार… 15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांना 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून मराठी सक्तीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. तूर्त भाषेसाठी परवाना रद्द होणार नाही, पण 1 मे ते 15 ऑगस्टदरम्यान परिवहन विभागाकडून विशेष पडताळणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या 100 दिवसांच्या काळात आरटीओकडून रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीचे धडे दिले जाणार आहेत. रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी 20 कलमी नियमावली बनवण्यात आली असून तिचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सरकारने दिला आहे.
परिवहन भवन येथे आज झालेल्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. केवळ मराठी भाषेच्या सक्तीवरून कारवाई होणार नसून परिवहन विभागाने नेमून दिलेल्या 20 कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर चालकांवरही कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर आणि अतिरिक्त परिवहन आयुक्त रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत सर्व संघटनांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा येणे आवश्यक आहे, ही भूमिका सर्वांनी मान्य केल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
सर्व आरटीओंना विशेष तपासणीचे निर्देश
राज्यातील सर्व 59 आरटीओंना 1 मेपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
विशेष समितीकडून नियमित आढावा
1 मेपासून राबवण्यात येणाऱ्या विशेष पडताळणी मोहिमेचे नेतृत्व अतिरिक्त परिवहन आयुक्त रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे सोपविण्यात आले आहे. ती समिती दररोज तसेच साप्ताहिक पातळीवर या मोहिमेचा आढावा घेईल आणि आरटीओंच्या अहवालांच्या आधारे पुढील कारवाईबाबत निर्देश देईल, असे सरनाईक यांनी नमूद केले. मोहिमेनंतर 16 ऑगस्ट रोजी सर्वंकष अहवाल सादर करण्यात येईल आणि पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मीरा-भाईंदरमधील 565 चालकांना नोटिसा
मीरा-भाईंदर येथे राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेबाबतही सरनाईक यांनी यावेळी माहिती दिली. मीरा-भाईंदरमध्ये 3,443 रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही याची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 565 चालकांना मराठी भाषेचे ज्ञान सिद्ध करता आले नाही. त्या चालकांना परिवहन विभागाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. तथापि या चालकांनी मराठी भाषा शिकण्याची तयारी दर्शविली आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
मराठी शिकण्यासाठी पुस्तिका देणार
मराठी शिकण्यासाठी इच्छुक चालकांसाठी आरटीओ कार्यालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ आणि ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ यांच्या सहकार्याने त्यांना मराठीची शिकवणी दिली जाणार आहे. तसेच मराठी शिकण्यासाठी पुस्तिका व ई-पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मराठी भाषा शिकलेल्या चालकांना राज्य शासनामार्फत प्रमाणपत्रही देण्यात येणार असून परवाना नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र आवश्यक राहील, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली.
महाराष्ट्रात मराठी बोलण्याचे बंधन कायद्यानेच आहे
महाराष्ट्रात मराठी बोलण्याचे बंधन आहे असे परिपत्रक 2019 आणि 2020 मध्येही तत्कालिन सरकारने काढले होते. राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना आम्ही यासंदर्भात निर्देश दिले आहेत, असे सांगत सरनाईक यांनी मराठी सक्तीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले. 100 दिवसांच्या मोहिमेत सगळे रिक्षा आणि टॅक्सीचालक मराठी बोलतील. या कालावधीत जुजबी मराठीही कुणी शिकू शकले नाही तर मग आपण बघू, असा इशाराही सरनाईक यांनी दिला. कोणी कितीही दबाव टाकला, संपाचे हत्यार उपसले, आंदोलनाच्या धमक्या दिल्या तरी महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकलेच पाहिजे आणि आम्ही शिकवायला तयार आहोत, शिकून घ्या, असेही सरनाईक यांनी सांगितले. कोणी मराठीत पीएच.डी. करा, एम.ए. करा, असे आम्ही सांगत नाही, पण प्रवाशांशी संवाद साधताना ते काय बोलतात आणि रिक्षा-टॅक्सीचालक काय बोलतात हे एकमेकांना समजलेच पाहिजे, इतकेही मराठी बोलायला येत नसेल त्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, असे ते पुढे म्हणाले.
Comments are closed.