अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी व्हावी, सीबीआयसारख्या संस्थेमार्फत तपास व्हावा, अशी मागणी केली जात आहे. तसेच, विधिमंडळ आणि संसदेतही यासंदर्भात आमदार-खासदारांनी आवाज उठवावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडून केली जात आहे. त्यासंदर्भाने, ते दिल्लीत जाऊन बड्या नेत्यांच्या, खासदारांच्या भेटीही घेत आहेत. त्यातच, आमदार अमित देशमुख (Amit deshmukh) यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत सरकारला सवाल केला आहे. तर, रोहित पवार यांनी अमित देशमुख यांचे आभार मानत सरकार ठोस भूमिका मांडेल, अशी अपेक्षा उपस्थित केली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, हा अपघात कशामुळे घडला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती हे अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुढे येऊन सांगितलेले नाही. त्यामुळे, उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर या राज्यात कोणीच सुरक्षित नाही, अशी भावना आता राज्यातील सामान्य जनतेची झाली असल्याचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे. अमित देशमुख यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होऊन बोलताना अजित पवारांच्या अपघातासंदर्भाने प्रश्न उपस्थित केला.
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत राज्याचा गृह विभाग किंवा राज्य शिष्टाचार विभाग यांच्या सचिवाकडूनही अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितले गेलेले नाही. राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात नक्कीच नियमावली आहे. मात्र, राज्यातील सुरक्षा यंत्रणा असोत किंवा ज्या विभागामार्फत बारामती विमानतळाचे संचालन होते त्या #MIDC आणि #MADC हे कोणतेच विभाग या संदर्भाने पुढे येऊन काहीच भाष्य करत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले. महाराष्ट्र शासनाने या संदर्भात सविस्तर निवेदन करावे, अशी मागणीही त्यांनी विधानसभेत केली. त्यामुळे, अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल आता विधानसभेतही प्रश्न उपस्थित झाल्यां दिसून आलं.
आमदार शशिकांत शिंदेंचाही सवाल
अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाची चर्चाच सभागृहात होऊ देत नाहीत. मी स्थगन प्रस्ताव आणला होता मात्र त्याला परवानगी दिली नाही. अल्पकालीन चर्चेला परवानगी दिली. मागील 5 दिवस झालं, याबाबतची चर्चा स्वीकारली मात्र अद्याप सभागृहात चर्चा होऊ दिली नाही. विधानसभा, विधानपरिषदेप्रमाणे लोकसभेत देखील बोलू देत नाहीत. त्यांच काय झालं हे आम्हाला कळायला हवं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
श्री.अमित देशमुख जी यांनी अजित दादांच्या अपघाताचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यांनी तांत्रिक बाबी उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे. या अधिवेशनातच या विषयी चर्चा घेऊन सरकार ठोस भूमिका मांडेल ही अपेक्षा आहे .@AmitV_Deshmukh… https://t.co/52aUsk2hnC
– रोहित पवार (@RRPSpeaks) 11 मार्च 2026
रोहित पवारांकडून अमित देशमुखांचे आभार
अमित देशमुख यांनी अजित दादांच्या अपघाताचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यांनी तांत्रिक बाबी उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे. या अधिवेशनातच याविषयी चर्चा घेऊन सरकार ठोस भूमिका मांडेल ही अपेक्षा आहे, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.