मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा

मुंबई : बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये संताप व्यक्त करत आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली. त्यानंतर, राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध करत अनेक जिल्ह्यात मराठा बांधवांनी मोर्चेही काढले, देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी लोकं रस्त्यावर उतरले होते. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही हे प्रकरण लावून धरले होते, विधिमंडळातही त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर, याप्रकरणी आरोपीला अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. त्यातच, परळीतील महादेव मुंडे हत्याप्रकरण आणि डीपीडीसीतील घोटाळा प्रकरणावरुन सुरेश धस आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन गेल्या 5 वर्षातील चौकशीची मागणी करणार असल्याचे आमदार धस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज अजित पवारांची (Ajit pawar) भेट घेतल्यानंतर आमदार धस यांनी प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बीडचे कलेक्टर अविनाश पाठक यांनी भेट घेतली. यासंदर्भात धस यांना प्रश्न विचारला असता, नियोजन विभागाने 2 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या आहेत, त्याबाबत त्यांनी अजित पवारांशी चर्चा केली आहे. मी अजित पवारांची भेट घेऊन 5 वर्षांच्या प्रशासकीय मान्यता चेक करण्याबाबत बोलणार आहे. कारण, सर्वाधिक जास्त घोटाळा 2019 मध्ये झाला आहे. तर, 72 कोटींच्या घोटाळ्याची यादी मी स्वत: अजित पवारांना दिल्याचे धस यांनी म्हटले. तसेच, 2019 ते 2022-23 मधे सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे. सध्या नियोजन विभागाने केवळ 2024 आणि 2025 ची चौकशी लावली आहे. मी उद्या अजित पवारांना विनंती करणार आहे, मागील 5 वर्षांची चौकशी करा. कारण, 25 जून 2023 पर्यंत सर्वांत जास्त बोगस बिले काढण्यात आली आहेत, असेही धस यांनी म्हटले.

82 दिवसांनी गुन्हा दाखल

परळी विधानसभा निवडणुकांवेळी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस गार्डसमोरच माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली होती. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र, या संदर्भात परळी पोलिसांनी साधा गुन्हा सुद्धा नोंदवून घेतला नव्हता. आता 82 दिवसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, त्यावरही धस यांनी प्रतिक्रिया दिली. मतदान दिवशीच्या मारहाणप्रकरणी 82 दिवसांनी पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेसाहेब देशमुख, त्यांचा बॉडीगार्ड आणि माधव जाधव यांना कशी वागणूक देण्यात आली हे राज्याने पाहिलं आहे. लगेच कलेक्टर यांनी गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र, त्यांनी केलं नाही. परळी मधील 330 पैकी 200 बुथ ताब्यात होते हे सिद्ध होतं, असे धस यांनी म्हटले.

मुंडे हत्याप्रकरणात आकाचा संबंध – धस

महादेव मुंडे यांच्या पत्नी उपोषणाला बसल्या असतील तर बीड एसपी साहेब ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे. त्या महिलेचा पती जाऊन 16 महिने झाले आहेत. याप्रकरणाचा तपास डीवायएसपींकडे दिल्यानंतर परळीतील 12 ते 15 लोक गायब आहेत. एसपी एलसीबी आणि डीवायएसपी यांनी या आरोपींना जेलमध्ये घालावं, अशी मागणीही धस यांनी केली आहे.  तसेच, या प्रकरणात आकाचा संबंध आहे. आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरणारेच महादेव मुंडे प्रकरणाचे आरोपी आहेत. या सगळ्या आरोपीच्या नावाची यादी मी एसपींना दिली आहे. कुणाचे सीडीआर चेक करायाला हवेत तेदेखील त्यांना सांगितला आहे, असे धस यांनी म्हटले.

हेही वाचा

काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड

अधिक पाहा..

Comments are closed.