साडेपाच हजार जागांसाठी 11 लाख अर्ज, नोकऱ्यांची दारे बंद असल्याने बेरोजगारी वाढली
राज्यात आणि देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने तरुण हताश होत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट-क साठी तब्बल 10 लाख 86 हजार 538 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विविध 14 संवर्गांतील 5 हजार 700 पदे भरली जाणार आहेत.
गट-क परीक्षेसाठी राज्यभरातून 10 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून सरकारी सेवेत प्रवेश मिळविण्यासाठी तयारी करीत आहेत. मात्र, पदांची संख्या मर्यादित आणि उमेदवारांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक पदासाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे. 10 लाख 86 हजार 538 अर्ज आणि 5,700 हून अधिक पदे अशी आकडेवारी पाहता, एका पदासाठी सरासरी 190 पेक्षा अधिक उमेदवार स्पर्धेत असण्याची शक्यता आहे. अंतिम पदसंख्या आणि अर्जांची विभागणी यानुसार ही संख्या बदलू शकते. त्यामुळे गट-कची परीक्षा राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
रोजगाराचा मुद्दा चर्चेत
गट-क परीक्षेसाठी आलेली दहा लाखांहून अधिक अर्जसंख्या ही केवळ स्पर्धेची आकडेवारी नसून सरकारी रोजगाराच्या मागणीचेही चित्र आहे. आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित केली जाणार होती. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा जानेवारी 2027 मध्ये घेतली जाणार आहे.
Comments are closed.