ई- केवायसी करुनही पैसे मिळेनात, जळगावात लाडक्या बहिणी आक्रमक, महिला आणि बालविकास केंद्रात धडक

जळगाव : महायुती सरकारला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता महिलांच्या असंतोषाला कारणीभूत ठरत आहे. भंडारा, बुलढाणा आणि वाशिमनंतर जळगावात लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळत नसल्यानं शेकडो महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लाडक्या बहिणींनी जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रात धडक दिली. या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर द्यावेत, अशी भूमिका घेतली आहे.

Ladki Bahin Yojana : जळगावात 1 लाखांहून अधिक महिलांचा लाभ अडकला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने शेकडो संतप्त महिला जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रात घुसल्या आहेत. लवकरात लवकर आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाखाहून अधिक महिला या लाडक्या बहीण योजनेस पात्र ठरल्या आहेत. मात्र, के वाय सी केल्याच्या नंतर एक लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने या महिलांचा आज उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. केवायसी करताना झालेल्या चुकांमुळे ही अडचण निर्माण झाल्याचं अधिकारी सांगत आहेत.

हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार होत नसल्याची तक्रार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ज्या अडचणी येत आहेत. या संदर्भात लाडक्या बहिणींनी  181 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेक महिलांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा संपर्क होत नसल्याचं समोर आलं आहे.

वाशिममध्ये महिला आक्रमक

वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाल्याने महिलांनी 18 आणि 19 जानेवारीला सलग दुसऱ्या दिवशी संताप व्यक्त केला होता. लाडक्या बहीण योजनेचाहप्ता मिळत नसल्याबाबत तक्रार मांडण्यासाठी मोठ्या संख्येने महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या होत्या.मात्र जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला होता.वारंवार विनंती करूनही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न मिळाल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध व्यक्त केला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्यानं अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.