देवेंद्र फडणवीसांनी जी भीती बोलून दाखवली तेच घडलं, प्लॅस्टिक उडत आलं अन ओव्हरहेड वायरवर पडलं, म

मुंबई लोकल ट्रेन पाऊस: मुंबई, ठाणेपालघर आणि रायगडसह कोकणात आज पावसाचा ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असतानाच, आता मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेला मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या विक्रोळी कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंट वायरवर प्लास्टिक उडून अडकल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

आज सकाळीच सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दुपारनंतर मुंबईत प्रचंड वेगाने वारे वाहणार असून त्यामुळे दुर्घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त केली होती. यानंतर काही वेळातच वादळी वाऱ्यामुळे प्लास्टिक उडून रेल्वेच्या मुख्य वायरवर पडले आणि मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली.

Mumbai Local Train Rain: कांजूर ते विक्रोळी दरम्यान लोकल जागच्या जागी खोळंबल्या

ओव्हरहेड वायरवर प्लास्टिक अडकल्यामुळे अप स्लो मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे नाहूर ते कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान एकूण 4 लोकल गाड्या एकामागोमाग एकाच रुळावर अडकून पडल्या आहेत. विक्रोळी आणि कांजूरमार्ग दरम्यान दोन गाड्या मधेच थांबवून ठेवाव्या लागल्या आहेत. रेल्वे स्थानकांवर “तांत्रिक बिघाडामुळे पुढील सूचनेपर्यंत गाडी सुटणार नाही,” अशा घोषणा सतत केल्या जात असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर हे प्लास्टिक काढण्याचे काम सुरू आहे.

Devendra Fadnavis: सभागृहात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

पाऊस आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात एक निवेदन दिले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “पाऊस आणि पूरपरिस्थितीच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज दुपारनंतर अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वेगाने वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे झाडे पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा. कोणीही अत्यावश्यक कारण असल्याशिवाय प्रवास करू नये. तरुणांनी या काळात पर्यटनासाठी धबधबे किंवा इतर ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन मी करतो. मी आज स्वतः राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात (SDMA) जाऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. आज मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज असल्याने मी उद्या सभागृहात यावर सविस्तर निवेदन देईन. राज्य सरकारने सर्व तयारी केली होती. गेल्या दोन दिवसांत दुर्घटना होऊ शकते, अशा जागा हेरून तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या सगळ्यात कुठेही सरकारी यंत्रणा कमी पडणार नाही, असे आश्वासन मी देतो,” असे त्यांनी म्हटले होते.

BMC मुंबई: मोठामुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम स्थळांच्या सुरक्षेच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना

सध्याचे हवामान आणि ताशी ७० ते ८० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विकासक, वास्तुविशारद, परवानाधारक सर्वेक्षक (LS), कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापक आणि बांधकाम स्थळांशी संबंधित अभियंते यांना खालील सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

१) बांधकामासाठी उभारलेले तात्पुरते मचान / परांची (स्कॅफोल्डिंग), सुटे व खुले साहित्य, क्रेनवरील साहित्य, संरक्षण भिंतींसह (कंपाऊंड वॉल्स) बांधकाम स्थळी असणारे पत्रे, साचाबांधणी (फॉर्मवर्क) तसेच सर्व तात्पुरत्या संरचनांची सखोल तपासणी करून त्या स्थिर, सुरक्षित आणि भक्कम स्थितीत असल्याची खात्री करावी.

इमारतीच्या वरच्या मजल्यांवर, गच्चीवर (टेरेस) आणि उंचावरील प्लॅटफॉर्मवर असलेले सुटे व खुले साहित्य त्वरित हटवावे किंवा योग्यप्रकारे बांधून सुरक्षित करावे.

२) कोणत्याही बांधकाम स्थळी अव्यवस्थित किंवा निष्काळजीपणे कामकाज होऊ देऊ नये. सर्व कामाचे नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणी सुरक्षितरित्या व पद्धतशीरपणे करावी.

खोदकाम करण्यात आलेल्या बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि त्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी.

३) टॉवर क्रेन, मटेरियल होईस्ट, बांधकाम लिफ्ट, सुरक्षा जाळ्या (सेफ्टी नेट्स) आणि उचलण्याची उपकरणे (लिफ्टिंग इक्विपमेंट) यांची स्थिरतेच्या दृष्टीने तपासणी करावी.

हवामानामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास उचलण्याची कामे (लिफ्टिंग ऑपरेशन्स) आणि उंचावरची सर्व कामे तात्काळ थांबवावीत. तसेच, बांधकाम सुरू असलेल्या परिसरात प्रतिबंधित सुरक्षा क्षेत्र (Exclusion Zone) कायम ठेवावे.

४) सर्व कामगारांनी निर्धारित वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) तसेच उंचावर काम करताना आवश्यक ‘फॉल प्रोटेक्शन’चा वापर करणे बंधनकारक आहे.

संपूर्ण बांधकाम स्थळाची तात्काळ सुरक्षा तपासणी करून सर्व असुरक्षित बाबी विलंब न करता दुरुस्त कराव्यात.

५) हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

सर्व संबंधितांनी या सुरक्षाविषयक सूचनांकडे अत्यंत तातडीची बाब म्हणून पाहावे. सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

कामगार, परिसरातील रहिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. सर्व विकासकांनी या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन लागू असलेल्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे आणि उत्कृष्ट बांधकाम पद्धतींचे काटेकोरपणे पालन करावे.

आणखी वाचा

Devendra Fadnavis on Missing Link:’इन्फ्रामॅनचा डिझास्टर मॅन झाला’, मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्यानंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना घेरलं

Comments are closed.