अखिल हिंदुस्थानी स्पर्धेत मुंबईच भारी; मुंबई बंदर, बीपीसीएल, आयएसपीएल, युनियन बँकेचे सहज विजय
गिरणगावाने तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा अखिल हिंदुस्थानी कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बंडय़ा मारुती सेवा मंडळाने दृष्ट लागण्याजोगे आयोजित केलेल्या अखिल हिंदुस्थानी कबड्डी स्पर्धेचा पहिला दिवस अस्सल मुंबईकर संघांनीच गाजवला. मुंबईच्या मुंबई बंदर, भारत पेट्रोलियम, इन्शुअर स्पोर्ट्स कोट (आयएसपीएल) आणि युनियन बँक या संघांनी सहज विजयाची नोंद केली.
ना. म. जोशी मार्गावरील बंडय़ा मारुती सेवा संघाने अखिल हिंदुस्थानी स्पर्धा आयोजनाचे शिवधनुष्य पेलताना गिरणगावकरांना प्रो-कबड्डीला साजेसे ग्लॅमरस दर्शन घडवले. या दिमाखदार स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औपचारिकरीत्या पार पडले. या सोहळय़ाला क्रीडाप्रेमी आमदार सुनील शिंदे, आमदार अजय चौधरी, आमदार भाई जगताप उपस्थित होते.
अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवलेल्या एका मॅटच्या मैदानाला आज आंतरराष्ट्रीय स्पर्धेला साजेसे स्वरूप प्राप्त झाले होते. हजारो कबड्डीप्रेमींच्या उपस्थितीत कबड्डीचा दम घुमला आणि आयएसपीएल संघाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करताना मिडलाईन अॅपॅडमीचा 39-33 असा पराभव केला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात किशोर जाटच्या वेगवान चढाया आणि नीरज मिसाळची त्याला लाभलेली साथ आयएसपीएलला विजय मिळवून देणारी ठरली. हा सामना मध्यंतराला 23-23 असा बरोबरीत होता.
दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य कामगार मंडळाची स्पर्धा जिंकणाऱया मुंबई बंदरने तमीळ थलायवाज संघाचा 50-39 असा सहज पराभव केला. साईल पाटील, रवी भाटी आणि सौरभ राऊत यांच्या सुसाट खेळामुळे मुंबई बंदरने दणदणीत विजय सलामी दिली. भारत पेट्रोलियमनेही मुंबई पोस्टलचा 45-25 असा धुव्वा उडवला. बीपीसीएलकडून मिलन दहियाने 11 गुण घेत सर्वोत्तम कामगिरी केली. युनियन बँकेनेही जयपूर क्युब्सचा 54-35 असा पाडाव केला.
Comments are closed.