मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी हायकोर्टाचा धक्कादायक निकाल; महाराष्ट्र एटीएसचा मोठा निर्णय

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील (Mumbai) लोकल ट्रेनच्या फर्स्टक्लास डब्यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॅाम्बस्फोटाचा धक्कादायक निकाल आज उच्च न्यायालयाने दिलाय. या स्फोटात 284 जणांचा मृत्यू आणि 800 पेक्षा अधिक जखमी झालेले होते. या प्रकरणात तपास यंत्रणांनी अटक केलेल्या 4 आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (highcourt) सत्र न्यायालयाचा निकाल फिरवत सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केलीय. त्यापैकी बशीर खान आणि मुजम्मिल शेख हे दोन आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. उच्च न्यायालयाच्या या निकालाने अनेकांना धक्का बसला असून आता एटीएसने (ATS) याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

हायकोर्टाच्या निकालानंतर बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली असून आदेश मिळताच पुण्यातील कारागृहात असलेल्या दोघांची सुटका केली जाईल. एकीकडे या निकालावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आता, याप्रकरणी मुंबई एटीएसने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.

मुंबईतील 2006 च्या पश्चिम रेल्वे साखळी बॉम्ब स्फोट खटल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदाच एटीएस म्हणजेच महाराष्ट्र राज्य, दहशतवाद विरोधी पथकाने भूमिका मांडली आहे. 30 सप्टेंबर 2015 रोजी मा. मोक्का विशेष न्यायालय, मुंबई यांनी निकाल दिला होता. त्यामध्ये 5 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, तर 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. याप्रकरणी एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, याप्रकरणी मृत्युदंडाच्या संदर्भाने आणि दोषी आरोपींचे अपिल उच्च न्यायालयातील न्या. किलोर आणि चांडक यांचे खंडपीठासमोर सुनावणीकरीता होते. नमुद खटल्यात ए.एस्.जी. राजा ठाकरे आणि स्पेशल पी.पी. चिमलकर यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. प्रस्तुत सुनावणी जुलै 2024 पासून खंडपीठासमोर सुरू होती. त्यामध्ये अभियोग व बचाव पक्षाचे युक्तीवाद २७ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण झाले होते. त्यामुळे, याप्रकरणी खटल्यामध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज रोजी निकाल दिला, त्यामध्ये मृत्युदंडाचे संदर्भ नाकारण्यात आले आणि दोषी आरोपींचे अपिल देखील मान्य करण्यात आले.तसेच, मोक्का [MCOCA] विशेष न्यायालयाचा निकालही रद्द करण्यात आला आहे.

एटीएस सुप्रीम कोर्टात जाणार

दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाकडून सदर खटल्याचे विशेष अभियोक्ता यांच्याशी सल्लामसलत करून व निकालाच्या विश्लेषणाअंती पुढील निर्णय घेण्यात येत आहे, असे एटीएसने म्हटले आहे. एटीएस मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे. सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी हायकोर्टाच्या निकालाचे अवलोकन करून अभ्यास करण्यात येईल. सरकारी वकिलांशी चर्चा करूनच सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी एटीएसकडून करण्यात येणार आहे.

हेही वाचा

लंडनहून येताच हवाई सुंदरीला घरी नेऊन अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी पायलटला अटक

आणखी वाचा

Comments are closed.