Mumbai Fire News – चर्चगेट स्थानकाजवळील ‘आयकर भवन’ इमारतीला भीषण आग, परिसरात धुराचे लोट
मुंबईतील पश्विम रेल्वे मार्गावरील चर्चगेट स्थानकाजवळील आयकर भवन या इमारतीला सोमवारी भीषण आग लागली. दुपारच्या सुमारास तळघरातून धुराचे लोट येऊ लागल्याने प्रचंड खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
मुंबई अग्निशमन दलाला दुपारी दोनच्या सुमारास आयकर भवन इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी या आगीला ‘लेव्हल-1’ आग घोषित केले आणि अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
ही आग या तळघर अधिक सात मजली इमारतीच्या तळघरापुरतीच मर्यादित होती. तळघरातून प्रचंड धूर निघत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वरच्या मजल्यांवर अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबवण्यात आली, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.
मुंबई, महाराष्ट्र: चर्चगेट येथील इन्कम टॅक्स इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे pic.twitter.com/91GND0oYEs
— IANS (@ians_india) 17 ऑगस्ट 2026
घटनास्थळी मदत व बचावकार्यासाठी अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गाड्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, वरिष्ठ केंद्र अधिकारी आणि केंद्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 3 फायर इंजिन, 1 सीएफएफ, 3 जेट युनिट्स, 1 एडब्ल्यूटीटी, 1 एमडब्ल्यूटी, 1 बावन, 1 डब्ल्यूक्यूआरव्ही, 1 टीटीएल आणि १ एएलपी टर्नटेबल लॅडर तैनात करण्यात आले आहे. याशिवाय मुंबई पोलीस, बेस्ट कर्मचारी, रुग्णवाहिका पथके आणि पालिकेच्या स्थानिक प्रशासकीय वॉर्डचे कर्मचारी मदतकार्यासाठी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अग्निशमन दलाकडून पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed.