कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू? असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कालिना FSL च्या प्रयत्नांना यश

मुंबई : गेल्या 10 दिवसांपूर्वी आलेल्या एका वृत्ताने सगळ्यांची झोप उडवली होती. कारण, रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील पायधुनी परिसरातून समोर आली होती. त्यामुळे, या घटनेचं गुढ वाढलं होतं. मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family Pydhonie) चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेचं खरं कारण शोधणं हे पोलीस (Police) आणि तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान होतं. याप्रकरणी आत्तापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर आली. उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वास्तव फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये, मुंबईतील (Mumbai) फॉरेन्सिक सायन्स (Forensic) लॅबोरटरीजचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे.

पायधुनीत एकाच कुटुंबातील मृत झालेल्या चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले आहेत. चौघांच्या शरीरात आणि घरातील कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील झिंक फॉस्फाईट सापडले आहे. कालिना एफएसएलमुळे तब्बल 11 दिवसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लागला असून मृत्यूचं खरं कारण समोर आलं. मात्र, कलिंगडचं नाव समोर आल्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी आणि मुंबईतील विक्रेत्यांवर याचा मोठा परिणाम झाला होता. पण, कालिना एफएसएलने हे सत्य शोधलं आहे.

मुंबईच्या पायधुनीतील कलिंगडमुळे मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या प्रकरणात कालिना एफएसएलचे संचालक डॉ. विजय ठाकरे यांच्या नेतृत्वात कालिना एफएसएलचे तज्ज्ञ अहोरात्र या प्रकरणाचा छडा लावण्यात गुंतले होते. या घटनेतील मृतांच्या शरीरातील बरेचसे विष हे उल्टीवाटे बाहेर पडल्याने शरीरातून विषाचे नमुने सापडणं कठीण होऊन बसलं होत. मात्र, सुक्ष्म निरीक्षक आणि छडा लावण्यासाठी घेतलेल्या मेहनतीने अखेर कालिना एफएसएलच्याय तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश आलं. घटनेतील मृत चारही जणांच्या शरीरात तसेच कलिंगडावर झिंक फॉस्फाइड हे विषारी औषध सापडलं. जे उंदीर मारण्यासाठी वापरलं जातं, त्याचे नमुने सापडल्यानेच चौघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तर, तब्बल 11 दिवसानंतर उंदीर मारण्याच्या औषधानेच एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

26 एप्रिल रोजीची घटना (Mumbai paydhuni 26 april)

दरम्यान,मुंबईत 26 एप्रिल रोजी अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. चौघांनी रात्री कलिंगड खाल्ले होते, कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. 26 तारखेला अब्दुल्ला डोकाडिया (44) त्यांची पत्नी नसरीन (35) आयेशा (16) आणि झैनब (13) यांचा अचानक मृत्यू झाला होता.

काय आहे झिंक फॉस्फाइड

झिंक फॉस्फाइड हे एक अत्यंत विषारी रसायन असून ते प्रामुख्याने उंदीर मारण्याच्या औषधात वापरले जाते. हे शरीरात गेल्यावर पोटातील आम्लाशी प्रतिक्रिया होऊन फॉस्फीन वायू तयार होतो, जो अतिशय घातक असतो. हे रसायन शरीरात गेल्यावर मळमळ, उलट्या पोटात तीव्र दुखणे चक्कर येणे, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणे घाम येणे, बैचेन व्हायला होते तसेच रक्तदाब कमी होऊ शकतो. हृदय, यकृतावर आणि मूत्रपिंडांवर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे बेशुद्ध होऊन परिणामी मृत्यू देखील होऊ शकतो.

हेही वाचा

कलिंगडमुळे नव्हे तर उंदीर मारण्याच्या औषधामुळेच मृत्यू, पायधुनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणी 11 दिवसांनी कारण समोर

आणखी वाचा

Comments are closed.