मंजुरीशिवाय अधिकाऱ्याविरोधात खटला चालवता येणार नाही, ईडीला हायकोर्टाचा दणका; मनी लाँडरिंगची तक्रार रद्द

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बेहिशेबी मालमत्ता व मनी लाँडरिंगच्या आरोपांप्रकरणी निलंबित अधिकाऱयाविरोधात कारवाई करणाऱया ईडीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला. केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्याविरोधात खटला चालवण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वपरवानगी न घेताच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेली कारवाई अवैध असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने याचिकाकर्त्याविरोधातील मनी लाँडरिंगची तक्रार रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच याच प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेला आदेशही न्यायमूर्तींनी रद्द केला.

केंद्रीय सीमाशुल्क विभागाचे निलंबित सह आयुक्त सचिन सावंत यांनी 12 जानेवारी 2011 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत स्वतःच्या व पत्नी, वडील आणि आईच्या नावे मालमत्ता जमा केली असून त्यांनी 2 कोटी 45 लाख 78 हजार 579 रुपयांचा खर्च केला. मात्र हा खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या कायदेशीर स्रोतांच्या तुलनेशी असंगत असून त्यांनी मैत्रिणीच्या मालकीच्या कंपन्यांच्या बँक खात्यांत पैसे वळवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना ईडीने जून 2023 मध्ये अटक केली होती. त्यानंतर हायकोर्टाने 9 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांना जामीन मंजूर केला. सावंत हे केंद्र सरकारचे अधिकारी असल्याने त्यांच्याविरोधात खटला चालवण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 197 (1)(अ) अंतर्गत केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते, मात्र अशी परवानगी न घेताच ईडीने विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यामुळे विशेष न्यायालयाने घेतलेली दखल कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचा दावा करत सावंत यांनी अॅड. मिथिलेश मिश्रा यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. केवळ सरकारी अधिकारी असल्यामुळे खटल्यासाठी सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद ईडीने केला. तो उच्च न्यायालयाने फेटाळला.

न्यायालयाचे निरीक्षण

– सरकारी अधिकाऱ्याविरोधात खटला चालवताना कलम 197 अंतर्गत आवश्यक पूर्वपरवानगी घेणे ही कायद्याने घालून दिलेली अनिवार्य अट आहे. अशा प्रकरणात पूर्वपरवानगी न घेता न्यायालयाने दखल घेतल्यास ती न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राशी संबंधित मूलभूत त्रुटी ठरेल व ती नंतर दुरुस्त करता येऊ शकत नाही.

– सरकारच्या आवश्यक पूर्वपरवानगीशिवाय सुरू केलेली कारवाई कायदेशीरदृष्ट्या टिकू शकत नाही.

Comments are closed.