मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे (Ram shinde) हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कामकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही. विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे, राम शिंदे यांना सभापती यांना पदावरुन दुर करण्यात यावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानपरिषदेतील सभापती आणि तालिका सभापती चित्रा वाघ यांच्यावर देखील एककलमी कार्यक्रमाचे गंभीर आरोप करत दोघांनाही पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबडास डॅनवे यांच्यासह आमदारांनी आपल्या सहीचे पत्रही सभापतींना पाठवले आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 183 (ग) व म.वि.प. नियम 11 नुसार आम्ही पुढील प्रस्तावाची सूचना देत आहोत. “महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा. सभापती प्रा.राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कासकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही, विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. तरी मा. सभापती यांना पदावरुन दूर करण्यात यावे.”, असा मजकूर दानवे यांनी दिलेल्या पत्रातून लिहिण्यात आला आहे.

विश्वास ठराव रेटून मांडला- दानवे

विधानपरिषदेतही महाविकास आघाडीचे आमदार संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषदेत विरोधक आमदारांनी सभात्याग करून ते सभागृहाबाहेर आले होते. विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध 5 मार्च रोजीच अविश्वास प्रस्ताव दिला होता. मात्र, काल हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. त्यावरूनही विरोधी पक्षातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, आज कुठेही सभागृहाच्या कार्यक्रमात नसताना भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर विश्वास ठराव मांडला आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचा त्यांना माज आहे, रेटून त्यांनी गोऱ्हे बद्दलचा विश्वास ठराव  मंजूर करून घेतला. आम्हाला कुठली बोलण्याची संधी त्यांनी दिली नाही, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी विरोध दर्शवला.

मविआचे उद्या काळ्या फिती लावून कामकाज

लोकशाही असल्याने विरोधी पक्षाच्या एका जरी आमदाराला भूमिका मांडू दिली पाहिजे. सभागृहात मुख्यमंत्री होते, विधान परिषद अध्यक्ष होते. मात्र, विरोधी पक्षातील आमदारांना बाजू मांडू दिली नाही. त्यामुळे, सभापती यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी अविश्वास ठराव मांडला असून आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, उद्या विधान परिषदेचे कामकाज देखील काळ्याफिती लावून करणार आहोत. उपसभापती जेव्हा सभापतीच्या खुर्चीवर बसतील तेव्हा एकही महाविकास आघाडीचा आमदार सभागृहात बसणार नाही, अशी भूमिका मविआच्या आमदारांनी घेतली आहे.

महाराष्ट्राचा मणिपूर बनवण्याचा प्रयत्न – आदित्य ठाकरे

दरम्यान, विरोधी पक्षातील शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही सभागृहातील वादावर भूमिका मांडली. दोन्ही सभागृहात मनमानी कारभार सुरु आहे. आम्ही प्रश्न विचारले तर मंत्रीच नसतात, मग बोलून, विषय मांडून फायदा तरी काय? वरच्या सभागृहात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला तरी रेटून नेण्याचं काम हे सत्ताधारी लोकांककडून केलं जातय. महाराष्ट्राचे मणिपूर बनवण्याचा प्रयत्न हे सरकार करतय, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत

अधिक पाहा..

Comments are closed.