‘विश्वास नांगरे पाटील अर्बन नक्षल म्हणून माझा एन्काऊंटर करतील’; नागपूर काँग्रेस शहराध्यक्षांचा
प्रफुल्ल गुडधे विश्वास नांगरे पाटील यांच्यावर महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांची नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त (Police Commissioner) म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, ते रुजू होण्यापूर्वीच नागपुरात मोठे राजकीय वादळ उठले आहे. नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील (Praful Gudadhe Patil) यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. “विश्वास नांगरे पाटील ‘अर्बन नक्षल’ म्हणून माझा एन्काऊंटर (Encounter) करतील,” अशी थेट भीती व्यक्त करत गुडधे पाटील यांनी नांगरे पाटील यांच्या विचारसरणीवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील म्हणाले की, “विश्वास नांगरे पाटील नागपुरात रुजू होण्यापूर्वीच त्यांच्याबद्दल आमच्या मनात अविश्वासाचे वातावरण आहे, बिगर हिंदू धर्मीयांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे. हिंदू संमेलनातील त्या व्हिडिओत विश्वास नांगरे पाटील फक्त संघाचे समर्थन करत नाहीयेत, तर ते मुळात ‘असंवैधानिक संकल्पना’ असलेल्या ‘हिंदू राष्ट्र’चेही समर्थन करत आहेत. ते एक पोलीस अधिकारी असल्याने, त्यांचे विचार निरपेक्ष आणि निधर्मी असले पाहिजेत. मात्र विश्वास नांगरे पाटील त्यांच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह ‘हिंदू राष्ट्र’ या असंवैधानिक संकल्पनेचाही पुरस्कार करताना दिसत आहेत.
Praful Gudadhe on Vishwas Nangre Patil: विश्वास नांगरे पाटील संघाचा एजेंडा राबवतील का?
त्यामुळे विश्वास नांगरे पाटील नागपुरात रुजू होण्यापूर्वीच बिगर हिंदू धर्मीयांमध्ये एक अविश्वासाचे आणि भीतीचे वातावरण आहे. विश्वास नांगरे पाटील नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून संघाचा एजेंडा राबवतील का? अशी असुरक्षिततेची भावना लोकांच्या मनात आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी नागपुरात रुजू होण्यापूर्वी ते एक निष्पक्ष आणि निधर्मी पोलीस अधिकारी आहेत अशी भूमिका स्पष्ट करावी आणि नागपूरकरांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे,” अशी मागणी त्यांनी केलीय.
Vishwas Nangre Patil: नेमकं काय आहे प्रकरण?
विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या व्हिडिओमध्ये ते एका हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्याचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवारयांच्या कार्याचा उल्लेख करताना आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी विश्वास नांगरे पाटील यांनी संघाच्या सामाजिक आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्याचा उल्लेख केल्याचे म्हणत त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्ष आणि नेटकऱ्यांनी सरकारी सेवेत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सार्वजनिक व्यासपीठावर अशा प्रकारची भूमिका मांडणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
Congress on Vishwas Nangre Patil: काँग्रेसची नांगरे पाटलांवर टीका
या प्रकरणावर केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्य पातळीवरही पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून विश्वास नांगरे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकारी सेवेत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सार्वजनिक मंचावर एका विशिष्ट विचारसरणीशी संबंधित संघटनेची स्तुती करणे योग्य नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
संविधानाची शपथ घेतलेल्या अधिकाऱ्यांनी राजकीय किंवा वैचारिक भूमिका सार्वजनिकपणे मांडणे हे लोकशाहीच्या तत्त्वांशी विसंगत असल्याचा आरोप काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित असावी, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे. नांगरे पाटील यांची नागपूर येथे पोलीस आयुक्त म्हणून झालेली बदली हा याच राजकीय अजेंड्याचा भाग असल्याचा संशय व्यक्त करत काँग्रेसने राज्य सरकारवरहीअप्रत्यक्ष प्रहार केला आहे. या संपूर्ण वादावर विश्वास नांगरे पाटील काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.