नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप; मंत्रालयातील लाचप्रकरणावर पटोले स्पष्टच बोलले
मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून लाच घेताना एका लिपिकास रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट मंत्रालयात छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होक आहे. या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंग याने 50 हजार रुपयांची लाच मागून त्यातील 35 हजार रुपये स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. तर, काँग्रेस नेत्यांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. नरहरी झिरवाळ आदिवासी असल्यानेच त्यांच्या कार्यालयात कारवाई झाली, नाहीतर सगळीकडेच भ्रष्टाचार सुरू असल्याचे नाना पटोले (Nana patole) यांनी म्हटले.
एसीबीसीच्या कारवाईवर मंत्री नरहरी झिरवळ यांनी भूमिका मांडली असून माझा “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” असे ते म्हणाले. मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तर, नाना पटोल यांनीही भूमिका मांडताना, राज्यातील सर्वच कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचे म्हटले.
सरकारमधील प्रत्येक विभागात असा भ्रष्टाचार सुरू आहे. मात्र, नरहरी झिरवळ हे आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला गेला. आम्ही किती स्वच्छ असे दाखवण्याचा हे प्रयत्न करत आहेत, असे म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्रालयात लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच, शासनाच्या प्रत्येक विभागात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही, हे उघड सत्य आहे, असेही पटोलेंनी म्हटले.
16 तारखेपर्यंत एसीबी कोठडी
दरम्यान, मंत्रालयातून अटक करण्यात आलेले अन्न व औषध प्रशासनाचे लिपिक राजू ढेरिंगे यांची 16 तारखेपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ढेरिंगे यांच्यासोबत या लाचप्रकरणात कोणा वरिष्ठांचा सहभाग आहे का? याचा तपास करायचा असल्याची माहिती एसीबीने कोर्टात दिली. त्यामुळे, 16 फेब्रुवारीपर्यंत एसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, लाचलुचपत विभागाने मंत्रालयातील कार्यालय सिल केले होते. या घटनेने राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. चौकशीदरम्यान वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितल्याची माहिती समोर येते आहे. हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
चंद्रपुरातील भूमिकेवर बोलणे नानांनी टाळले
चंद्रपूर काँग्रेस वाद आणि नगरसेवकांनी पैसे घेतल्याचा आरोपावर नाना पटोले यांनी स्पष्टपणे बोलणे टाळले. मला यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. याबद्दल सर्व माहिती आमच्या हायकमांडकडे गेली आहे, मी काही चर्चा करणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले. तसेच, आता चंद्रपुर नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे चित्र भाजपाचे पहायला मिळेल. देशात अशी परिस्थिती पाहायला मिळेल, असेही पटोले यांनी सांगितले.
अमेरिका ट्रेड करारामुळे शेतकऱ्यांचे मरण
सोयाबीनचे दर पडले आहेत, मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या करारामुळे शेतकऱ्याचं मरण होणार आहे. भाजपच्या सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या गाजराची चर्चा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. भाजपाने बाहेरच्या लोकांना घेऊन आपली सत्ता चमकवण्याचा प्रयत्न केला हे सर्व चित्र दिसेल, ही सुरुवात आहे. याचा शेवट फार वाईट असेल, असेही नानांनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.