मलबार गोल्ड अँड डायमंड कंपनीला लाखोंचा चुना, सोन्याची नाणी संशयास्पदरित्या गायब; नेमकं काय घडलं

नाशिक क्राईम न्यूज : मुंबईतील नामांकित मलबार गोल्ड अँड डायमंड (Malabar Gold and Diamonds) कंपनीकडून नाशिकमधील (Nashik) एका खासगी कुरिअर कार्यालयाकडे पाठवण्यात आलेली तब्बल 9 लाख 87 हजार 130 रुपये किमतीची सहा सोन्याची नाणी (गोल्ड कॉइन्स) संशयास्पदरित्या गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ही नाणी नेमकी कुणी, कशासाठी आणि कोणत्या उद्देशाने ऑर्डर केली, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसल्याने हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मलबार गोल्ड अँड डायमंड कंपनीने याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 16 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत मलबार गोल्डच्या नावाने एका संकेतस्थळावरून नाशिकमधील खासगी कुरिअर कार्यालयाकडे सहा वेगवेगळ्या नावांनी सहा सोन्याच्या नाण्यांची ऑर्डर देण्यात आली होती. प्रत्येक शिपमेंटमध्ये ‘गोल्ड कॉइन’ असल्याचे नमूद करण्यात आले होते आणि प्रत्येक पार्सलसाठी वेगवेगळे ट्रॅकिंग नंबर वापरण्यात आले होते.

Nashik Crime News: बनावट नावे आणि संशयास्पद मोबाईल क्रमांक

या ऑर्डरसाठी ‘राज पटेल’, ‘सलोनी चव्हाण’, ‘नितीन कोकणी’ आणि ‘अवतल असे’ अशी वेगवेगळी नावे वापरण्यात आली होती. विशेष म्हणजे, सर्व ऑर्डरसाठी 9376678705 आणि 9649452670 हे दोन मोबाईल क्रमांक नोंदवण्यात आले होते. डिलिव्हरीच्या वेळी संपर्कासाठी पुन्हा 9785960688 आणि 8239847258 हे दोन अनोळखी मोबाईल क्रमांक वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऑर्डर देणारे आणि डिलिव्हरीसाठी संपर्क करणारे व्यक्ती वेगळे असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

Nashik Crime News: डिलिव्हरी कॅन्सल, परत आलेले पार्सल रिकामे

कुरिअर कार्यालयातील एकाच डिलिव्हरी बॉयने ही सहा पार्सल ताब्यात घेतली आणि ‘डिलिव्हरीसाठी जात असल्याचे’ सिस्टिममध्ये नोंदवले. मात्र, काही वेळानंतर ‘डिलिव्हरी कॅन्सल’ झाल्याचे कारण दाखवत त्याने सर्व पार्सल परत आणली. ही पार्सल पुन्हा मलबार गोल्डकडे पाठवण्यात आली. मात्र, मलबार गोल्डकडून परत आलेली पार्सल तपासण्यात आली असता, त्यामध्ये सोन्याची नाणीच नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कंपनीची जवळपास दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

Nashik Crime News: सायबर पोलिसांचा सखोल तपास

या प्रकरणी मलबार गोल्डकडून आर्थिक फसवणूक आणि विश्वासघाताची तक्रार दाखल करण्यात आली असून, सायबर पोलिसांनी कंपनीशी अधिकृत पत्रव्यवहार सुरू केला आहे. ऑर्डर देताना वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक, त्यांचे कॉलिंग पॅटर्न, तसेच डिलिव्हरी बॉय आणि संबंधित संशयित व्यक्तींचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) काढण्यात येत आहेत. याशिवाय, संबंधित कुरिअर कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजचीही बारकाईने तपासणी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय पिसे करत असून, डिलिव्हरी बॉयची सखोल चौकशी करण्यात येत आहे. आता प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा

Mumbai Crime Malad Railway station:ओंकार शिंदेने आलोक सिंहांच्या पोटात चाकू नव्हे तर हिरेजडित दागिने हाताळण्यासाठीचा चिमटा खुपसला, पोलिसांकडून महत्त्वाची माहिती

आणखी वाचा

Comments are closed.