नाशिकमध्ये महाविकास आघाडीचं ठरलं, शरद पवार, ठाकरे गट, काँग्रेस अन् मनसे एकत्रित निवडणुकीच्या रि
नाशिक निवडणूक 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) तारीख जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईठाण्यासह राज्यातील सर्व 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय मोर्चेबांधणी केली जात असून आता नाशिकमधून (Nashik News) एक मोठी बातमी समोर येत आहे.
नाशिकमध्ये महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि काँग्रेस असे सर्व पक्ष एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मत विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष एकत्रित आल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Nashik Election 2026: नाशिकमध्ये महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब
एकीकडे नाशिकमध्ये महायुतीत दोन गट पाडल्याचे पाहायला मिळत आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहेत. तर भाजप स्वबळावर लढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. मत विभाजन टाळण्यासाठी सर्व घटक पक्षांना एकत्र करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसापासून मॅरेथॉन चर्चा सुरू होत्या. त्यावर आज महाविकास आघाडी करायची, असा निर्णय सर्वच पक्षांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता नाशिकची निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक निवडणूक 2026: नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना ‘मोठा भाऊ’
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारा पत्रकार परिषदेत म्हणाले की, बैठकीच्या दोन, तीन फेऱ्या झाल्यात. 10 ते 12 जागांचा तिढा कायम आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय होईल. मनसे, काँग्रेस, शिवसेना, आम्ही सगळे एकत्रित निवडणूक लढणार आहोत. ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढणार आहे. मोठा भाऊ शिवसेना असणार आहे. त्यांच्या कोट्यातून मनसेला जागा दिल्या जाणार आहेत.
Malegaon Election 2026: मालेगावात भाजप–शिंदे सेना युतीचा पेच
दरम्यान, मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीबाबतचा संभ्रम कायम आहे. युतीच्या चर्चांचे गुऱ्हाळ सुरू असतानाच भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. काही पदाधिकारी युतीला विरोध करत असून तर काही अजूनही अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपमध्येच कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. नुकतेच पक्षप्रवेश केलेले अद्वय हिरे, बंडूकाका बच्छाव आणि सुनील गायकवाड यांनी युतीला तीव्र विरोध दर्शवत तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली आहे. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वेड्यात काढत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.