गीतेंची माघार, तरीही महायुतीला भीती, नाशिकच्या नगरसेवकांची भिवंडीत रवानगी; नरेश म्हस्के कारण स

नाशिक : नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या (nashik vidhan parishad election 2026) पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आणखी एका हालचालीची भर पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते (gokul gite) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतरही नाशिकमधील नगरसेवकांना थेट भिवंडीतील अंजूर येथील साया ग्रँड रिसॉर्टमध्ये आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान दगाफटका टाळता यावा, यासाठी ही खबरदारी घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  (gokul gite)

नाशिकमधील सुमारे 20 ते 22 नगरसेवक भिवंडीतील एका रिसॉर्टमध्ये दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा शिवसेना नेते तथा खासदार नरेश मस्के आणि ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झालेले रविंद्र फाटक यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, गीते यांच्या माघारीनंतरही नगरसेवकांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यामागील कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, याबाबत माध्यमांशी बोलताना खासदार नरेश मस्के यांनी कोणतेही राजकीय कारण नसल्याचे सांगत हा शिवसेना पक्षाचा विभागीय मेळावा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या घडामोडींमुळे राजकीय वातावरण आणखी तापले असून भिवंडीतील रिसॉर्ट पुन्हा एकदा राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे. (gokul gite)

Nashik Vidhan Parishad Election 2026: बहुमत असूनही महायुतीला धास्ती का? कुठं बिघडू शकतं समीकरण?

नाशिक विधान परिषद निवडणुकीत मागील काही दिवसांत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या कार्यपद्धतीवर मित्रपक्ष भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि खुद्द शिंदे गटातील काही नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांची बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि मंत्री उदय सामंत या तीन बड्या मंत्र्यांना नाशिकमध्ये ठाण मांडावे लागले होते. दीर्घ चर्चेनंतर गोकुळ गिते यांनी माघार घेऊन महायुतीला पाठिंबा देण्याचे मान्य केले असले, तरी तांत्रिक अडचण अशी आहे की, गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे या दोन्ही बंडखोरांची नावे मतपत्रिकेवर कायम असणार आहेत. नाराज मतदार ऐनवेळी पक्षादेश झुगारून या बंडखोरांच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवू शकतात, याच गोष्टीची मुख्य धास्ती शिवसेना शिंदे गटाला असल्याची चर्चा आता रंगली आहे.

या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान पद्धती असते. सभागृहात प्रत्येक राजकीय पक्षाचा ‘व्हिप’ लागू असतो, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत सभागृहाबाहेर अशी कोणतीही सक्तीची व्यवस्था नसते. त्यामुळे मतदार मतपेटीपाशी आपल्या मर्जीनुसार मतदान करण्यास पूर्णपणे स्वतंत्र असतात. ऐनवेळी मने वळवून किंवा अंतर्गत नाराजीचा फायदा उठवून बाह्य शक्तींनी मतदान फिरवू नये, यासाठी महायुतीने थेट ‘हॉटेलवारी’चे नियोजन केल्याचे बोलले जात आहे.

Comments are closed.