नंदुरबारमधील नवापूर एमआयडीसीत दोन टेक्स्टाईल कंपन्यांना भीषण आग, स्फोटसदृश्य आवाजांनी मोठी घबराट; सुदैवाने जीवितहानी नाही
नंदुरबार जिह्यातील नवापूर औद्योगिक वसाहतीतील एका टेक्स्टाईल कंपनीत सोमवारी दुपारी आग लागली. काही वेळातच रौद्र रूप धारण केलेल्या आगीने शेजारील कंपनीलाही वेढले. तब्बल सात अग्निशमन बंबांच्या मदतीने संध्याकाळी उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, स्फोटसदृश आवाज आणि धूराचे लोट यामुळे जवळील गावात मोठी घबराट पसरली होती. या आगीत कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
नवापूर एमआयडीसीतील ई-20 निओ फॅशन टेक्स्टाईल कंपनीत दुपारी साडेबाराच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. कापड व मशिनरीमुळे ती भडकली. काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी शेजारील रिचेरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीलाही वेढले. याची माहिती मिळताच नवापूर अग्निशमन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून या दोन कंपन्यांसोबतच जवळील इतर कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. आगीची भीषणता लक्षात घेवून नंदुरबार, साक्री, पिंपळनेर येथूनही बंब व टीमला पाचारण करण्यात आले. दरम्यान, दोन-तीन स्फोटसदृश आवाजाने परिसरात घबराट पसरली होती.
शेजारील गुजरात राज्यातील सोनगड, व्यारा, बारडोली येथूनही अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. संध्याकाळी उशिरापर्यंत आगीवर काहीसे नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. पोलीस आणि प्रशासन यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.
कोट्यवधींचे नुकसान
या आगीत दोन्ही पंपन्यांमधील कच्चा माल, तयार कापड, यंत्रसामग्री जळून खाक झाली, हे नुकसान कोटय़वधींच्या घरात आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी धुराचे प्रचंड लोट उठल्याने काहींना श्वसनाचा त्रास जाणवत होता.
Comments are closed.