Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) आज बीड (Beed) जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बीडमधील लोकप्रतिनिधी अजित पवारांसमवेत विविध कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान,आपण नियोजित कार्यक्रमामुळे बाहेरगावी असल्याचं आमदार धनंजय मुंडे यांनी आधीच जाहीर केलं आहे. तर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang sonavane) यांची उपस्थिती लक्षणीय ठरत आहेत. त्यातच, बजरंग सोनवणे यांच्याकडून अजित पवारांना देण्यात आलेल्या 500 रुपयांच्या नोटेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, अजित पवारांनी ती नोट सोनवणेंना परत केल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

बीडमध्ये सहकारभवनच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी पूजेसाठी बसलेल्या अजित पवारांकडे पुरोहिताला दक्षिणा देण्यासाठी बजरंग सोनवणे यांनी आपल्या खिशातून पाचशे रुपयांची नोट काढत शेजारी असलेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली. संदीप क्षीरसागर यांनी ती नोट त्यांच्याच बाजुला असलेल्या आमदार विक्रम काळे यांच्याकडे दिली. विक्रम काळे यांनी ती नोट अजित पवार यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवारांनी ती नाकारली आणि नको म्हणून सांगितले. त्यानंतर ही नोट पुन्हा विक्रम काळे यांनी संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली आणि संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा ती बजरंग सोनवणे यांच्याकडे दिली. बजरंग सोनवणे यांनी गेलेले पैसे परत आले म्हणत पुन्हा ती 500 रुपयांची नोट आपल्या खिशात ठेवून दिली. सध्या, सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच, बीडकर या व्हिडिओचा आनंद घेत आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी दुसऱ्याकडून पैसे घेत येथे दक्षणा ठेवल्याचंही व्हिडिओ दिसून येत आहे.

बजरंग सोनवणेंचा अजित पवारांसमवेत हवाई प्रवास

महापालिका निवडणुकीनिमित्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे पाहायला मिळाल्यानंतर आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कार्यक्रमात शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. तर व्यासपीठावरूनच अजित पवार यांनी निवडणूक झाली, आता चांगल्या कामासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील केले. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी आमदार संदीप क्षीरसागर अजितदादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होताना खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या हेलिकॉप्टरने हवाई प्रवास केला. त्यामुळे महापालिका निवडणुकीनिमित्त एकत्र आलेली राष्ट्रवादी बीडच्या विकासासाठी एकत्र आल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो

आणखी वाचा

Comments are closed.