‘मला राजकारण समजायला उशीर झाला, पण…’; ‘माझा सन्मान’मध्ये नितीन गडकरींनी उलगडले रंजक किस्से!

मुंबई : आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्त्या स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नुकतंच ‘एबीपी माझा’च्या एका विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय तत्त्वांवर आणि अनुभवांवर अतिशय मनमोकळेपणाने प्रकाश टाकला. मला राजकारण समजायला नक्कीच थोडा उशीर झाला, पण आता मी माझ्या स्वतःच्या अटींवर (Terms) राजकारण करतोय आणि मला जे योग्य वाटते तेच मी जाहीरपणे बोलतो, असं वक्तव्य त्यांनी केलं.

एबीपी माझाच्या वतीने आयोजित ‘माझा सन्मान पुरस्कार 2026’ (ABP Majha Sanman Awards 2026) या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील दिग्गज जसे की सुनील गावसकर, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर आणि पंडित विजय घाटे यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांची संयुक्त मुलाखत घेतली आणि त्यांचे अनेक रंजक किस्से समोर आले.

Nitin Gadkari Speech : मत नाही दिले तरी काम करणार

मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी यांनी राजकारण्यांना आणि व्यवस्थेला एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, “राजकारणामध्ये अनेक कलाकार आहेत. कलाकारांनी राजकारणी असण्याची गरज नाही, पण आजच्या राजकारण्यांनी मात्र एक चांगला कलाकार असण्याची गरज आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नव्हे, तर ते शिक्षण, आरोग्य आणि समाजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं एक उत्तम साधन आहे. ते तुम्ही केलं तर जनतेचं समर्थन तुम्हाला मिळतं. मला हे राजकारण समजायला जरा उशीर झाला. पण तुम्ही जर प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली, तर तुम्हाला मोठे पोस्टर्स, कट-आउट्स लावण्याची किंवा लोकांना काही ‘खायला-प्यायला’ देण्याची अजिबात गरज भासत नाही.”

आपल्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना गडकरी पुढे म्हणाले, “मी लोकांना नेहमी अगदी स्पष्टपणे सांगत असतो की, तुम्ही मला निवडणुकीत मत दिले तरीही मी तुमचे काम करणार आणि नाही दिले तरीही मी तुमचे काम करणारच. माझा राजकारणातील अनुभव चांगला आहे. त्यामुळे मला राजकारणात फार दबावाखाली काम करावं लागत नाही.”

Nitin Gadkari Fan Moment : विमानातील ‘त्या’ एअर होस्टेसचा मजेशीर किस्सा

नितीन गडकरी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा उल्लेख करत एक भन्नाट ‘फॅन मोमेंट’ (Fan Moment) उपस्थितांसोबत शेअर केला. ते म्हणाले, “सोशल मीडियावर माझे तब्बल साडेसहा कोटी फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर माझ्या भाषणांमधून जी काही कमाई होते, ते सर्व पैसे मी समाजकार्यासाठी दान करतो. एकदा मी विमानाने प्रवास करत असताना, विमानातील अनेक प्रवासी माझ्याभोवती गोळा झाले आणि फोटो काढू लागले. तेव्हा विमानातील एअर होस्टेसने (Air Hostess) सर्वांना रागाच्या सुरात सुनावले की, गडकरी साहेबांना त्रास देऊ नका. हे पाहून मला वाटले की ती प्रवाशांना शिस्त लावतेय. मात्र, सर्व प्रवासी बाजूला झाल्यावर तीच एअर होस्टेस हळूच माझ्या जवळ आली आणि म्हणाली, ‘साहेब, तुम्ही जरा तिकडे बाजूला याल का?’ मी जेव्हा विचारले का? तेव्हा ती म्हणाली की, तिला आणि विमानातील पायलटला (Pilot) माझ्यासोबत फोटो काढायचा आहे.”

गडकरींनी हा किस्सा सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. शेवटी घरच्या पोह्याची आठवण करून देत, अनेक मोठे लोक ते खायला आवर्जून येतात, असंही गडकरींनी आवर्जून सांगितलं.

ही बातमी वाचा:

Comments are closed.