लोकांचा कौल सत्तेच्या बाजूने, त्यामुळे सत्तेसोबत गेलो, ओमराजेंनी सगळं सांगितलं
मुंबई : मी माझ्या आयुष्यातील सगळा वेळ हा सर्वसामान्य लोकांसाठी दिलाय, त्यांच्या अडचणींच्या वेळी धावून गेलोय. असं असतानाही नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमच्या उमेदवारांचा दारून पराभव झाला. त्यावेळी लोकांनी सत्तेच्या बाजूने कौल दिला, त्यामुळे आम्हाला देखील सत्तेच्या बाजूनं जावं लागलं असं खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) म्हणाले. माझ्या निधीचे मूल्यमापन हे पाच वर्षांनी करा, आताच नको असंही ते म्हणाले. तसेच आपण जरी शिंदेंच्या शिवसेनेत आलो असलो तरी राणा पाटलांच्या कुटुंबाला कायम विरोध करणार, असंही ते म्हणाले.
ओमराजे निंबाळकरांनी त्यांना मिळालेल्या खासदारकीचा निधी अद्याप खर्च केला नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यावर ओमराजेंनी माध्यमांसमोर त्यांची बाजू मांडली. तसेच राणा पाटील कुंटुंबावरही यावेळी त्यांनी जोरदार टीका केल्याचं दिसून आलं.
Omraje Nimbalkar On MP Fund : पाच वर्षांच्या कामाचं मूल्यमापन करावं
ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “खासदाराचा निधी हा पाच वर्षांचा असतो. त्या पाच वर्षांच्या काळात जर खासदाराचा निधी शिल्लक राहिला तर त्या खासदारांचे ते अपयश असते. पण पाच वर्षांच्या नंतर त्याच्या निधीच्या कामाचं मूल्यमापन करावं. पाच वर्षात, 2019 ते 2024 या पा वर्षात मला मिळालेला निधी हा सर्व खर्च झाला आहे. एकही रुपया शिल्लक राहिलेला नाही. तुम्ही ही माहिती एमपीलॅडवरून काढून घेऊ शकता.”
ओमराजे निंबाळकर पुढे म्हणाले की, “माझ्या मतदारसंघातील बूथची संख्या ही 2475 पर्यंत आहे. एका वर्षाला पाच कोटी निधी मिळतो, तो पाच वर्षांसाठी 25 कोटी इतका होतो. आता 2475 बूधमध्ये हा निधी वाटला तर प्रत्येक बूथला तो जवळपास एक लाख रुपये इतका मिळतो. एक लाख रुपयात काय काम होणार? हा निधी पाच वर्षांचा आहे. एखाद्या शाळेचं, रस्त्याचं किंवा सभा मंडपाचं काम असेल तर किमान सात ते दहा लाख रुपये दिलं तर काम होतं. एखाद्या ठिकाणी निधी दिला गेला नाही तर लोक नाराज होतील, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांची अपेक्षा असते.”
Omraje Nimbalkar On Dharashiv Election : काम करूनही आमच्या लोकांचा पराभव
मी माझ्या आयुष्यातला पूर्ण वेळ मतदारसंघातील सामान्य व्यक्तीला दिला आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला विचारा, तुमच्या आयुष्यातील अडचणीच्या वेळी ओमराजे उपलब्ध होता का? जर मी काहीच काम केलं नसेल आणि लोकांनी जर निकाल दिला नाही तर त्याचा आम्ही विचार करू. पण एवढं काम करूनही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीमध्ये आमच्या सदस्यांना दारूण पराभव स्वीकारावा लागला. आमचे लोक हे मशाल चिन्हावरच निवडणूक लढवत होते, तरीही पडले, अशी खंत यावेळी ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केली.
Omraje Nimbalkar On Shivsena : सामान्य लोकांचा सत्तेला कौल
ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “मी सुद्धा जनतेला प्रश्न विचारण्याची गरज आहे. काम करणाऱ्या आमच्या लोकांचा पराभव का झाला? सत्ता नसल्याने लोकांचा विश्वास राहत नाही. एवढं काम करुनही एकही नगरपालिका आमच्या विचारांची नाही, एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नाही. सामान्य लोकांनी सत्तेच्या बाजूने कौल दिला, म्हणून आम्ही देखील सत्तेच्या बाजूने गेलो.”
Omraje Nimbalkar On Ranajagjitsinha Patil : राणा पाटलांना विरोध कायम
शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर भाजपच्या राणा पाटलांना विरोध कायम ठेवणार का असा प्रश्न ओमराजेंना विचारण्यात आला. ते म्हणाले की, “मी राजकारणात येण्याचं कारण कधीही लपवून ठेवलो नाही. ज्याने नीच काम केलंय त्याला आमचा विरोध कायम, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. अशा नालायक लोकांचं राजकारण संपवणार अशी शपथ घेऊनच मी राजकारणात आलो आहे. ज्यावेळी ते भाजपमध्ये आले त्यावेळी मी शिवसेनेत होतो. त्यावेळीही मी त्यांना कायम विरोध केला, यापुढेही कायम विरोध करणार.”
ही बातमी वाचा:
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Comments are closed.