‘ओमराजे निंबाळकर कोणत्याही बैठकीला जाणार नाही’; ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला न जाण्याचं कारणही
ओमराज निंबाळकर: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) मुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. या कथित बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या नावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर ठाकरे गटाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना ‘व्हीप’ जारी केला असून गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता खासदार ओमराजे निंबाळकर प्रतिक्रिया समोर आली आहे.
ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. सध्या माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ‘पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण’ (Pawanraje Nimbalkar Case) सर्वात महत्त्वाचे आहे. या प्रकरणाचा महत्त्वाचा निकाल 20 जून रोजी येणार आहे. हा निकाल आल्यानंतरच मी माध्यमांशी संवाद साधून माझी पुढील अधिकृत भूमिका मांडेल. तोपर्यंत मी इतर कोणत्याही गोष्टीवर बोलणार नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. तसेच ओमराजे निंबाळकर दिल्लीत नसून सध्या आपल्या कुटुंबासह पुण्यातच असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
Shiv Sena UBT Meeting: ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्हीप जारी
दरम्यान, ठाकरे गटाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना ‘व्हीप’ (Whip) जारी केला असून गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत संसदीय दलाची (Parliamentary Party Meeting) तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक म्हणजेच खासदारांच्या एकनिष्ठतेची ‘लिटमस टेस्ट’ मानली जात आहे. शिंदे गटासोबत 6 खासदार गेल्याचा दावा केला जात असला, तरी लोकसभा अध्यक्ष (Speaker) ओम बिर्ला यांच्याकडे दिलेल्या पत्रात 6 पैकी 2 खासदारांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. आश्वासन पूर्ण न झाल्याने 2 खासदारांनी सह्या केल्या नसून ते ठाकरे गटासोबतच राहतील, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता ऑपरेशन टायगरबाबत सस्पेन्स आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये शिवसैनिक आक्रमक
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य बंडखोरीच्या वृत्तामुळे धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंना एकदा आमदार आणि दोनदा खासदार करून भरभरून दिले, तरीही त्यांनी गद्दारी केल्यास ते सहन केले जाणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख बंडू आदरकर आणि सुरेश गवळी यांनी आक्रमक पवित्रा घेत, “ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ते जिल्ह्यात दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला शेण फासू,” असा थेट इशारा दिला आहे. आता संपूर्ण राज्याचे लक्ष 20 जून रोजी लागणाऱ्या पवनराजे केसच्या निकालाकडे आणि त्यानंतर ओमराजे काय निर्णय घेतात याकडे लागले आहे.
‘ऑपरेशन टायगर’ची टाईमलाइन- (Shivsena Operation Tiger)
- 10 जून- एनडीच्या बैठकीदरम्यान अमित शाह, शिंदेंमध्ये ऑपरेशन टायगरबाबत चर्चा
- अमित शाहांनी मोदींशी चर्चा करून संमती मिळवली
- 10 जून- शाह यांची फडणवीस, शिंदेंसोबत बैठक आणि ग्रीन सिग्नल
- 10 जून- दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट
- 14 जून- उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली
- अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर
- नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित
- ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव गैरहजर
- 15 जून- खासदार संजय देशमुखांची दिल्लीत प्रतापराव जाधवांशी भेट
- 16 जून- रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या, शिंदेही रवाना
- फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
- 17 जून- संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजेंची पत्रकार परिषद
- ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांना पत्र
- ठाकरेंकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप
ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे- (Shivsena MP List)
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
कोणते खासदार शिंदे गटात गेले? (Operation Tiger Shivsena MP)
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
आणखी वाचा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Comments are closed.