Pandharpur Wari 2026 – जिल्हाधिकाऱ्यांनीच मोडला व्हीआयपी दर्शन बंदीचा आदेश, वारकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात केले स्वागत!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> सुनील उंबरे

जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी व्हीआयपी दर्शन बंदी बाबत काढलेला आदेश, आज स्वतःच मोडला. त्यांच्या या कृतीचे वारकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले.

किस्सा फार रंजक आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी सचिन इथापे आदी मंडळी श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शन रांगेची व्यवस्था पाहण्यासाठी गेले होते. दर्शन रांगेची व्यवस्था पाहताना जिल्हाधिकाऱ्यांना या रांगेत एक अतिशय थकलेले वयोवृद्ध जोडपे दिसले. वयोमानानुसार थकलेल्या आज्जीच्या पाठीचा कणा पार वाकला होता. आजीला उभा ही राहता येत नव्हते. पण विठुरायाच्या दर्शनाची ओढ असल्याने, काठीचा आधार अन् विठ्ठलाचा धावा करीत हे वयोवृद्ध जोडपे चालत होते. या वयोवृद्ध दांपत्याची भक्ती पाहून भारवलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या वृद्ध जोडप्याची आस्थेने चौकशी केली. हे जोडपे अमरावती जिल्ह्यातील, दोघे ऐशी पंचाऐशी वयाचे आहेत.

पदस्पर्श दर्शनासाठी सद्या आठ ते दहा तासांचा अवधी लागतो आहे. आजोबा ठीक असले तरी आज्जी पार थकलेली असल्याने दहा तास दर्शन रांगेत या अवस्थेत उभे राहणे फारच कष्टदायी, पण आजीची विठ्ठला प्रति असलेली ओढ आणि भक्ती पाहून जिल्हाधिकाऱ्यांचे मन उचंबळून आले डोळे पाण्याने डबडबले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज्जी आजोबांचा हात धरला आणि दोघांनाही दर्शन रांगेतून बाहेर काढले. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविलेला माणुसकीचा हा ओलावा, ज्येष्ठा प्रति असलेला आदर सन्मान पाहून दर्शन रांगेतील हजारो वारकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचे समर्थन केले.

दरम्यान, मंदिर समितीची गाडी आली या गाडीतून या दांपत्याला शॉर्टकट मार्गे थेट विठुरायाच्या समोर उभे केले. अवघ्या काही मिनिटांत आपले देवाचे दर्शन घडते आहे यावर दोघांचा विश्वास बसेना. दोघांनी डोळे भरुन दर्शन घेत आपल्या आनंद अश्रूंना वाट करून दिली. निरोप घेताना जिल्हाधिकाऱ्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवत तुझ्या हातून अशीच सेवा घडू दे, असा आशीर्वाद दिला.

दि. 15 जुलैपासून श्री विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. सामान्य भाविक हाच आमचा व्हीआयपी अशी सक्त भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी घेतली आहे. त्यामुळे राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी वर्ग श्री गोरे आणि श्री कार्तिकेयन यांच्यावर नाराज आहे मात्र सामान्य वारकरी भाविक खुश आहेत.

Comments are closed.