पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांची निर्घुण हत्या झाल्यानंतर महिना उलटूनही पोलिसांना अद्याप एक मारेकरी सापडत नाही. तसेच, पोलिसांकडून तपासाबाबत वेळोवेळी माहिती दिली जात नसून आम्हाला न्याय हवा आहे, माझ्या भावाचं जे झालं तसंच मलाही ठार मारलं जाईल, त्यामुळे मीच स्वत:ला संपवून घेतो, असे म्हणत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. खंडणी प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात यावा, त्यांनाही खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे अशी मागणी करत धनंजय देशमुखांनी आज मस्साजोग गावात टाकीवर चढून आंदोलन केले. यावेळी, संपूर्ण ग्रामस्थ देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. तर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही गावात जाऊन धनंजय देशमुख यांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यास लावले. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) पत्रकारांनी घेरलं असता, या विषयी प्रश्न करताच त्यांनी उत्तर न देता आपली गाडी पुढे नेली.

सीआयडीच्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावावा, या मागणीसाठी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय हे पाण्याच्या टाकीवर चढले होते. दिवसेंदिवस हे प्रकरण गंभीर होत असताना मंत्री पंकजा मुंडेंनी मात्र यावर बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं. उद्योजकता विकास परिषदेसाठी त्या पिंपरी चिंचवडमध्ये आल्या होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग, केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि एसपी सिंग बगेल उपस्थित होते. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत धनंजय देशमुखांच्या अनुषंगाने पंकजा मुंडेंना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, प्रोटोकॉलनुसार केंद्रीय मंत्र्यांनी बोलल्यानंतर मला बोलता येणार नाही, असं कारण मुंडेंनी पुढं केलं. त्यानंतर, काही वेळाने केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री रवाना झाले. त्यानंतर ही माध्यमांनी पंकजा मुंडेंनी मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तातडीनं गाडीत बसून गाडीच्या काचा वर घेऊन पंकजा मुंडेंनी काढता पाय घेतला. मस्साजोग व देशमुख.. देशमुख… असा प्रश्न पत्रकारांकडून करण्यात येत होता. मात्र, पंकजा मुंडेंनी उत्तर देणं टाळल्याचं दिसून आलं.

धनंजय देशमुख- मनोज जरांगेंच्या डोळ्यात पाणी

दरम्यान, राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरण चांगलच तापलं असून धनंजय देशमुख यांनीही स्वत: मी जीव देतो, असे म्हणत टाकीवर चढून आंदोलन केल्याने ग्रामस्थही काळजीत होते. तर, मनोज जरांगे पाटील व धनंजय देशमुख यांच्यात फोनवरुन झालेल्या संवादावेळी दोघांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी समाज रस्त्यावर उतरत आहे. मात्र, बीडच्या नेत्या व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडेंनी याबाबत बोलणं टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

हेही वाचा

जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार

अधिक पाहा..

Comments are closed.