परळीत उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत, जेसीबीतून फुलांचा वर्षाव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या गद्दार खासदारांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. परभणीतील दौरा आटपून धाराशिवकडे जात असताना बीड जिल्ह्यात आगमन होताच उद्धव ठाकरे यांचं परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले तर यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांचा गजर देखील करण्यात आला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणीकडून धाराशिवकडे जात असताना परळीत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील परिसर यावेळी दुमदुमून गेला.
परळीतील नागरिकांकडून उद्धव ठाकरे यांना पाचवे ज्योतिर्लिंग वैजनाथाची प्रतिमा देण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिमा हातात घेत त्या प्रतिमेवर डोकं टेकवत आपली भावना व्यक्त केली. दरम्यान उद्धव ठाकरे यांना पाहण्यासाठी परळीतील शिवसैनिकांबरोबरच नागरिकांनी देखील मोठी गर्दी केलेली दिसून आली.
Comments are closed.