परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?
परभणी महानगरपालिका 2026: राज्यात गेल्या 7 वर्षांपासून रखडलेल्या आणि मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. राज्यातील मुदत संपलेल्या 27 आणि नव्याने तयार झालेल्या दोन महापालिका अशा एकूण 29 महानगरपालिकांच्या या निवडणुका पार पडणार आहेत. (Muncipal Corporation Election 2025-26) महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पाडणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडेल.
परभणी महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. परभणीमध्ये युती आणि आघाडीकडून प्रचारही सुरू आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर परभणीत सत्ता समीकरणे बदलली आहेत. सध्या परभणीत कोणाचं वर्चस्व अधिक आहे? किती जागा आहेत? परभणीचं राजकीय चित्र कसं आहे? पाहूयात.
परभणी महापालिकेचा इतिहास
2011 च्या जनगणनेत परभणी शहराने तीन लाख लोकसंख्येचा टप्पा ओलांडल्यानंतर लातूर चंद्रपूरसह परभणीला महानगरपालिका बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. आधीच्या नगरपरिषदेचा काळ संपल्यानंतर 2012 मध्ये परभणीत महानगरपालिकेचे पहिली निवडणूक झाली. 2011 – 12 मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर परभणीचे पहिलं महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठी होतं. तेव्हा महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. पहिले महापौर होण्याचा मान प्रतापराव देशमुख यांना मिळाला होता. तर दुसरे महापौरपद इथेच मागासवर्ग महिलांसाठी राखीव होते. यावेळी राष्ट्रवादीच्या संगीता राजेंद्र वाडकर यांना ही संधी मिळाली होती. 2017 मध्ये झालेल्या दुसऱ्या निवडणुकीत पहिला अडीच वर्षांसाठी महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते. 2017 मध्ये महापौर मीना वरपूडकर होत्या.
परभणी महानगरपालिका निवडणूक 2017
एकूण जागा-65
काँग्रेस – 31
राष्ट्रवादी – 18
भाजप – 08
शिवसेना – 06
अपक्ष/इतर -02
परभणी महापालिकेची राजकीय रचना कशी?
परभणी महानगरपालिकेत 16 प्रभाग असून 65 सदस्य संख्या आहे. 15 क्रमांकाच्या प्रभागात प्रत्येकी पाच सदस्य असून उरलेल्या सर्व प्रभागात प्रत्येकी चार सदस्य निवडून येतात. परभणीत दोन लाख 61 हजार 239 मतदार आहेत. यात एक लाख 28 हजार 635 महिला मतदार आहेत. 2017 मध्ये झालेल्या महानगरपालकेच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. 2017 मध्ये काँग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस 19 नगरसेवकांपर्यंत पोहोचली होती. भाजप आणि शिवसेनेचे 8 आणि 5 अनुक्रमे नगरसेवक होते. गेल्या पाच वर्षांपासून परभणी प्रशासकांच्या ताब्यात असली तरी मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. शहरात रस्ते, कचरा, खड्डे, ट्रॅफिकच्या सुविधा, पाणी याच मुद्द्यांवर पुन्हा एकदा महापालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे.
परभणीत महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा परभणीत आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचा आहे. काँग्रेसचे अनेक नगरसेवक महायुतीत गेल्याने काँग्रेस पक्षात पोकळी निर्माण झाली आहे.
परभणीत काँग्रेसचाच झेंडा फडकणार?
महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर परभणीत रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ता समीकरणे बदलल्यामुळे परभणी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळेसही परभणी महापालिकेची निवडणूक ही मूलभूत गरजांवरच लढवली जात आहे. परभणी आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला राहिला आहे. महाविकास आघाडी परभणीत एकत्र निवडणूक लढवण्याची चिन्ह दिसत असल्याने महापालिकेवर महाविकास आघाडीचाच महापौर बसेल असा विश्वास व्यक्त होतोय.
दुसरीकडे महाविकास आघाडीसह महायुतीनेही परभणी महापालिकेसाठी दंड थोपटले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राजेश विटेकर यांच्यासारखा तरुण आमदार मिळालाय. काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने दादांची राष्ट्रवादी परभणीत मजबूत झाल्याचे सांगितलं जातंय. शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचे महानगरप्रमुख आनंद भरोसे हा नवा चेहरा मिळाला आहे. त्यामुळे महापौरपदावर आमचाच चेहरा येणार असा दावा महायुतीकडूनही केला जातोय.मनपासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर भाजपच्या सत्तेसाठी प्रयत्नशील आहेत. तर आमदार राजेश विटेकरांना राष्ट्रवादीची सत्ता अपेक्षित आहे. खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील उद्धवसेनेच्या सत्तेसाठी प्रयत्न करतायत. काँग्रेसला पूर्वीप्रमाणे सत्ता राखण्यासाठी झगडावे लागत आहे. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनीही परभणीत आघाडी पॅनल उभारण्याच्या प्रयत्नात आहेत.
Parbhani: सध्याचे राजकारण
परभणीत प्रमुख पक्ष आतापर्यंत स्वबळावर महापालिका लढवण्याचे नारे देत होते. पण आता युती किंवा आघाडीसाठी पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनपा निवडणुकींची विविध पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मागील अनेक वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून महापालिकेचा कार्यकाळ संपला आहे. तेव्हापासून मनपाचा कारभार प्रशासक पाहत आहेत. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असल्याने अनेक वॉर्डमध्ये चुरशीची लढत होणार आहे. परभणीतील 16 प्रभागांमधून 65 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मागच्या निवडणुकीत काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने लढत दिली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा मिळाल्या होत्या. आता राष्ट्रवादीचेच दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेकांनी ऐनवेळी सत्तेची साथ देत अजित पवार गटात उड्या मारल्या. तर मागच्या निवडणुकीत भाजपचे 8 तर शिवसेनेचे 5 नगरसेवक होते.
परभणी महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सत्ताधारी असलेल्या भाजपने शहरातील मलनिःसारण योजना आणि वाढीव पाणीपुरवठा योजना अशा 2 योजनेच्या 550 कोटींच्या निविदा टक्केवारीसाठी उघडल्या असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. या आरोपांमुळे भाजप चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रशासकांनी राजकीय दबावाला बळी पडून त्यांनी अशा प्रकारे आणि आचारसंहितेमध्ये साडेपाचशे कोटींच्या कामाच्या निविदा काढल्या आहेत. या निवडणुकीत दोन्ही योजनेच्या निविदाचा मुद्दा चांगलाच तापणार आहे.
सेना-भाजपच्या युतीचे त्रांगडे मिटणार
परभणीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे पदाधिकारी इकडून तिकडे पक्षप्रवेश करत आहेतच. शिवाय नेत्यांच्या मुलांचेही पक्षप्रवेश होत आहेत. परभणीतील काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांचे चिरंजीव दत्तराव रेंगे यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे. दत्तराव रेंगे हे प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवणार आहेत तर भाजप नेते विजय वरपूडकर यांच्या चिरंजीव ऐश्वर्य वरपुडकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केलाय. आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालाय. ते प्रभाग 5 मधून निवडणूक लढवणार आहेत.
दुसरीकडे परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची अंतिम बोलणी सुरू आहे. परभणीच्या विकासासाठी आम्ही महापालिकेत युती करू, भाजप दोन पावले मागे जाईल अथवा आम्ही जाऊ पण महापालिकेत युती करू असे शिंदे सेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर आम्हाला शिवसेनेसोबत युती करण्याचा आदेश आहेत त्यामुळे आज शिंदे सेनेसोबत बैठक घेऊन युतीचा निर्णय होईल असे भाजप नेत्यांनी सांगितले आहे. आता ही युती समसमान जागांवर होते का? याकडे परभणीकरांचे लक्ष आहे. कुणाला किती जागा मिळतात हे युती झाल्यानंतर फायनल होणार आहे. सेना-भाजपच्या युतीचे त्रांगडे मिटणार असल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा
Comments are closed.