इथली शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय; परभणीत शिंदेंच्या शिवसेनेत घमासान
परभणी: भाजपने दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्वच जिल्ह्यासाठी 58 जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष कामाला लागल्याचं दिसून येत आहे. महायुतीमध्ये भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, व नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यात, परभणी जिल्ह्यात शिवसेना शिंदे (Shivsena) गटात वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, येथील शिवसेना जिल्हाध्यक्षपदी (Parbhani) नवा चेहरा दिल्याने मावळते जिल्हाध्यक्ष व शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच, शिवसेनेच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड म्हणजे शिवसेना पक्ष भाजपच्या दावणीला बांधणे होय, असेच व्यंकट शिंदे यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी, आपण पक्षनेतृत्वाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार घमासान झाल्याचे पाहायला मिळत आहे काल नवीन जिल्हाप्रमुख म्हणून आनंद भरोसे यांची निवड पक्षाकडून करण्यात आली. मात्र, या निवडीला मावळते जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांनी व त्यांच्या गटाने तीव्र विरोध केला आहे. आनंद भरोसे हे भाजपमधून विधानसभेच्या वेळेला आयात केलेले उमेदवार होते. तसेच, दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या सख्ख्या भावाला भाजपने शहराच्या अध्यक्षपदाची जबाबादीर दिली आहे. तरीही, आनंद भरोसे यांना पक्षाने जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती दिली आहे. परभणीतील एकाही पदाधिकाऱ्याला हे मान्य नसल्याचं व्यंकट शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच इथली शिवसेना ही भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय झाला असल्याचा गंभीर आरोपही व्यंकट शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. दरम्यान, या निर्णयाविरुद्ध शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठींकडे आपलं म्हणणं मांडणार आहेत आणि जर पक्षाने ऐकलं नाही तर सर्वजण आपले राजीनामे देणार असल्याची माहितीही यावेळी शिंदे यांच्याकडून देण्यात आली.
राज्यात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर पक्षनेतृत्वात बदल करुन सर्वच रजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र, स्थानिक स्तरावर राजकीय पक्षांच्या नेत्यांमधील मतभेद पाहता हे कितपत शक्य आहे हे लवकरच समजेल.
हेही वाचा
गृह विभागाचा मोठा निर्णय, पोलीस हेड कॉन्स्टेबलही गुन्ह्यांचा तपास करण्याच अधिकार; राजपत्र जारी
अधिक पाहा..
Comments are closed.