फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर

फलटण डॉक्टर प्रकरण: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या खळबळजनक आत्महत्या प्रकरणात गेल्या पाच महिन्यांपासून कारागृहात असलेल्या बडतर्फ पीएसआय (PSI) गोपाळ बदने याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि काही अटींवर हा जामीन दिला आहे.

Phaltan Doctor Case: पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर

23 ऑक्टोबर 2025 रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली होती. बदने गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याने जामिनासाठी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.

Phaltan Doctor Case: नेमकं प्रकरण काय होतं?

मूळची बीड येथील असलेली ही महिला डॉक्टर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होती. ती प्रशांत बनकर याच्या घरी भाड्याने राहत होती. काही कारणास्तव घरमालक बनकर आणि डॉक्टर यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर तिच्या घराला कुलूप लावण्यात आले होते. यानंतर तिने ‘मधूदीप’ हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी खोली आरक्षित केली. तिने मदतीसाठी प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने याच्याशी संपर्क साधला होता, मात्र तिला अपेक्षित मदत मिळाली नाही.  दोन दिवस खोलीचा दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी तो तोडला असता, डॉक्टरने आत्महत्या केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, तिने मृत्यूपूर्वी स्वतःच्या हातावर एक चिठ्ठी (नोटीस) लिहिली होती. त्यात गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर याच्या शारीरिक व मानसिक छळामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले होते.

Phaltan Doctor Case: न्यायालयाचा निर्णय

या प्रकरणात फलटण पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीत सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अखेर न्यायालयाने काही अटी घालत बदनेचा जामीन अर्ज मंजूर केला. या निर्णयामुळे तपास यंत्रणांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: ऑफिसमधून टॅब चोरला, तब्बल 200 नको ‘ते’ व्हिडीओ, अन् पुढे…; खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक मोठं कांड, नेमकं प्रकरण काय?

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या मुलावर SIT कडून प्रश्नांची सरबत्ती, पण मुलाचं सर्व प्रश्नांना आढेवेढे घेत एकच उत्तर; म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.