साय-फाय – डेटा भविष्यातील मौल्यवान संपत्ती

>> प्रसाद ताम्हणकर
[email protected]

एकेकाळी जगातील महासत्तांमध्ये भूभागासाठी युद्धे झाली. त्यानंतर तेल, वायू आणि खनिज संपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. आजही तेलाला जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता (Ai), डिजिटल व्यवहार आणि इंटरनेटच्या युगात एक नवीन संपत्ती वेगाने सर्वाधिक मौल्यवान ठरत आहे ती म्हणजेडेटा.

आज आपण दिवसाची सुरुवात मोबाईलने करतो आणि दिवसाचा शेवटही मोबाईलवरच होतो. सोशल मीडिया, ऑनलाइन खरेदी, यूपीआय व्यवहार, जीपीएस, ओटीटी प्लॅटफॉर्म, सर्च इंजिन आणि विविध मोबाईल अॅप्सच्या वापरातून आपण सतत माहिती निर्माण करत असतो. आपण कुठे जातो, काय खरेदी करतो, कोणत्या विषयात रस घेतो, कोणत्या बातम्या वाचतो, कोणते व्हिडीओ पाहतो आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, याची नोंद कुठे ना कुठे होत असते. ही माहिती एकत्रित करून तिचे विश्लेषण केले जाते आणि त्यातून आपल्या सवयी, आवडी, आर्थिक क्षमता आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीचा अंदाज बांधला जातो. जगात कोणतीही गोष्ट पूर्णपणे मोफत नसते. मोफत वाटणाऱया अनेक डिजिटल सेवांची किंमत आपण आपल्या वैयक्तिक माहितीच्या रूपाने चुकवत असतो.अनेकांना या व्यवहाराची जाणीवही नसते. आपण पैसे देत नाही म्हणून सेवा मोफत आहे असे वाटते; पण प्रत्यक्षात आपली माहितीच त्या सेवांचा सर्वात मोठा मोबदला ठरत असते.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाया वापरामुळे डेटाचे महत्त्व अनेक पटींनी वाआहे. Ai ही जादू नसून माहितीवर आधारित तंत्रज्ञान आहे. जशी शेतकऱयाला भरघोस पीक घेण्यासाठी सुपीक जमीन आवश्यक असते, तसाच Ai ला दर्जेदार आणि विश्वासार्ह डेटआवश्यक असतो. चुकीचा किंवा अपुरा डेटा असेल तर चे निष्कर्षही दिशाभूल करणारे ठरू शकतात. त्यामुळे डेटा हे नवीन तेल नाही. डेटा ही नवीन जमीन आहे आणि Ai हा त्या जमिनीवर शेती करणारा शेतकरी आहे.नापीक जमिनीवर भरघोस पीक येत नाही आणि सुपीक जमीन असली तरी शेतकरी नसेल तर तिचा उपयोग होत नाही.

याच कारणामुळे आज जगभरात डेटा सार्वभौमत्व आणि डेटा गोपनीयता यांसारख्या संकल्पनांना महत्त्व प्राप्त झाले आहे. नागरिकांचा डेटा कोणाच्या ताब्यात आहे? तो कोणत्या देशात साठवला जात आहे? त्याचा वापर कोणत्या उद्देशासाठी केला जात आहे आणि त्यावर नियंत्रण कोणाचे आहे? हे प्रश्न आता केवळ तांत्रिक राहिलेले नाहीत. अनेक देशांनी डेटा संरक्षणासाठी स्वतंत्र कायदे करण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्थाननेही डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा लागू करून या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भविष्यात आर्थिक सामर्थ्याबरोबरच डेटा सुरक्षित ठेवण्याची क्षमता हीदेखील राष्ट्रांच्या प्रगतीची महत्त्वाची कसोटी ठरणार आहे.

आज जगातील मोठय़ा तंत्रज्ञान कंपन्या आणि अनेक देश डेटा मिळविण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. कारण डेटा हा केवळ व्यापारासाठीच नाही, तर अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, निवडणुका, जाहिरात, संशोधन आणि जनमत घडविण्यासाठीही प्रभावी साधन ठरत आहे. सोशल मीडियावरील अल्गोरिदम आपल्याला आवडणारीच माहिती पुनः पुन्हा दाखवत राहतात आणि नकळत आपल्या विचार विश्वालाही आकार देतात. त्यामुळे डेटा हा केवळ तांत्रिक विषय नसून सामाजिक आणि लोकशाही व्यवस्थेशी संबंधित विषय बनला आहे.

डिजिटल सुविधांचा लाभ घेत असताना आपल्या माहितीची किंमत आणि सुरक्षिततेचे महत्त्व समजून घेणे आज अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या अॅपला कोणती परवानगी द्यायची, कोणती माहिती शेअर करायची आणि कोणत्या सेवांवर विश्वास ठेवायचा, याचा विचार प्रत्येकाने सजगपणे करायला हवा. कारण भविष्यातील खरी स्पर्धा तेलाच्या साठय़ांवर नव्हे, तर माहितीच्या साठय़ावर आणि त्यावरील नियंत्रणावर असणार आहे. भविष्यात सर्वात श्रीमंत तो नसेल ज्याच्याकडे सर्वाधिक पैसा असेल; तर तो असेल ज्याच्याकडे सर्वाधिक विश्वासार्ह डेटा आणि त्या डेटाचा सुयोग्य वापर करण्याची क्षमता असेल.

Comments are closed.