पूजा खेडकरच्या बंगल्यात डबे पोहोचताच कुणकुण लागली, पोलीस गेटवर चढून घरात शिरले अन्…

पूजा खेडकर कुटुंब: नवी मुंबईतून सुरू झालेल्या एका अपघाताच्या घटनेनंतर प्रकरणात नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) कुटुंबावर आता अपहरण, पोलिसांशी अरेरावी आणि आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पूजा खेडकरच्या घराबाहेर लावलेली नोटीस खेडकर कुटुंबाने फाडल्याचे समोर आले असून, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) आणि आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) हे अपहरणासाठी वापरलेली गाडी घेऊन सध्या फरार आहेत.

दरम्यान, खेडकरांच्या पुण्यातील बंगल्यात दोन जेवणाचे डबे पोहोचले आहेत, यामुळे चर्चेला नवे फाटे फुटले आहेत. बंगल्याचा गेट बंद असल्याने हे डबे सुरक्षा भिंतीवर ठेवण्यात आले. काही वेळातच एक कर्मचारी तिथे आला आणि हे डबे उचलून निघून गेला. या पार्श्वभूमीवर, हे जेवण नेमके कोणासाठी मागवले गेले होते? दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर अजूनही बंगल्यात लपून बसले आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोलीस गेटवर चढून घरात शिरले

या माहितीची खबर लागताच पुणे पोलिसांची टीम पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दाखल झाली. दरवाजा उघडण्यास कोणीही पुढे न आल्यामुळे पोलिसांनी गेटवरून आत प्रवेश केला. पोलिसांनी बंगल्यात उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाब नोंदवले असून, फरार असलेल्या दिलीप आणि मनोरमा खेडकरांचा शोध सुरूच आहे. आता दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकरला पोलीस नेमके कधी ताब्यात घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

शनिवारी सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमारास, मुलुंड-ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 क्रमांकाच्या लँड क्रूझर गाडीचा अपघात झाला. या अपघातानंतर, गाडीतून उतरलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. यानंतर ट्रक चालकाने ही माहिती तात्काळ मालक विलास ढेंगरे यांना दिली आणि रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी संशयित गाडीचा मागोवा घेतला. तपासादरम्यान MH 12 RP 5000 क्रमांकाची लँड क्रूझर पुण्यातील बाणेर रस्त्यावर एका बंगल्यासमोर उभी असल्याचे आढळले. ही मालमत्ता पूजा खेडकर यांच्या वडील दिलीप खेडकर यांच्या नावे आहे.

दरवाजा उघडण्यास नकार, पोलिसांवर कुत्री सोडली

पोलिसांनी बंगल्यावर पोहोचून दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर त्यांनी पोलिसांवर घरातील कुत्रे सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही वेळाने प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, मात्र याच दरम्यान दिलीप खेडकर दुसऱ्या मार्गाने पळून गेले, अशी माहिती समोर आली आहे.

दिलीप आणि मनोरमा खेडकर फरार, गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकारानंतर, मनोरमा खेडकर यांच्यावर चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि आरोपीला पळवून लावणे अशा गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, खेडकर कुटुंबाने मुंबई पोलिसांनी लावलेली नोटीस फाडल्याचेही समोर आले आहे. सध्या दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे अपहरणासाठी वापरलेल्या गाडीसह फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=K4zpvttcmca

आणखी वाचा

Pune Crime Pooja Khedkar Family : इकडं पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा शोध लागेना, तिकडं पुण्यातील बंगल्यावर जेवणाचे डबे पोहोचले, नेमकं चाललंय तरी काय?

आणखी वाचा

Comments are closed.