भाजप म्हणाली फक्त 15 जागा सोडू, शिवसेनेने अशी यादी पाठवली की वाचाच बंद झाली, पुण्यात काय घडलं?

पुणे महानगरपालिका निवडणूक 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस हा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वादामुळे चर्चेचा विषय ठरला. पुणे महानगरपालिकेत एकूण 165 नगरसेवक आहेत. मात्र, एकट्यानेच पुण्यात सत्ता गाजवायची महत्त्वाकांक्षा असलेल्या भाजपने शिंदे सेनेला फक्त 15 जागा देण्याची तयारी दाखवली होती. त्यावर एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेने (Shivena) पाठवलेली 15 उमेदवारांची यादी पाहून जागावाटपाची चर्चा करणाऱ्या भाजपच्या (BJP) नेत्यांची वाचाच बंद झाली. परिणामी भाजपने पुण्यात शिवसेनेशी जागावाटपाची चर्चा बंद करुन आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही भाजपशी युती होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर लगेचच मुंबईतून पुण्याला 165 एबी फॉर्म पाठवून दिले. यानंतर नाना भानगिरे आणि रवींद्र धंगेकर (Ravindra Dhnangekar) यांनी शिवसेना-भाजप युती तुटल्याचे सांगितले. परंतु, काहीवेळातच विजय शिवतारे यांनी अजूनही भाजपशी चर्चा सुरु आहे, असे सांगून यू-टर्न घेतला. परंतु, अंतर्गत चर्चेत पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी ज्याप्रकारे भाजपला 15 जागांवरुन पेचात पकडले आहे, ते पाहता शिवसेना-भाजप युती होण्याची शक्यता दुरापास्त आहे.

पुण्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपासाठी बैठका सुरु होत्या. सोमवारी रात्री साडेबारा वाजता शिवसेनेने प्रसारमाध्यमांना पत्रकार परिषद घेणार असल्याचा संदेश पाठवला होता. त्यावेळी शिवसेना-भाजप युती तोडली जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, पाऊण वाजता ही पत्रकार परिषद रद्द झाल्याचा निरोप आला. त्यानंतर दुसऱ्या दिवस उजाडल्यावर पुण्यात भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली. भाजपने सांगितल्यानुसार शिवसेनेने त्यांना 15 उमेदवारांची यादी दिली होती. मात्र,  शिवसेनेने सांगितलेल्या या 15 जागा सोडणे, भाजपसाठी अशक्य कोटीतील गोष्ट होती. शिवसेनेचा हा प्रस्ताव भाजपच्या अगदी जिव्हारी लागला आणि त्यांनी युतीत निवडणूक लढवण्याचा विचारच सोडून दिला, असे सांगितले जाते. या 15 उमेदवारांमध्ये नीलम गोऱ्हे,अजय भोसले, विजय शिवतारे, उल्हास तुपे, रवींद्र धंगेकर, आबा बागुल यांचा समावेश होता.

Shivsena in Pune Election: शिवसेनेने भाजपकडे कोणत्या 15 जागा मागितल्या?

भाजपने पुण्यात शिवसेनेला फक्त 15 जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती. इतक्या कमी जागांवर लढणे शिवसेनेला शक्य नव्हते. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या पुण्यातील शिलेदारांनी भाजपला अशी 15 नावं पाठवली की, तो प्रस्ताव मान्य करणे भाजपला शक्यच नव्हते.  या यादीमध्ये, प्रभाग क्रमांक 41 ब मधून प्रमोद नाना भानगिरे, 41 क स्वाती अनंत टकले, 24 ड प्रणव रवींद्र धंगेकर, 23 क प्रतिभा रवींद्र धंगेकर, 26 ड उल्हास उर्फ वसंतराव बागुल, 37 क गिरीराज तानाजी सावंत, 37 ड रूपाली रमेश कोंडे, 38 क वनिता जालिंदर जांभळे, 38 इ स्वराज नमेश बाबर, 39 क मनिषा गणेश मोहिते, 6 ड आनंद रामनिवास गोयल, 3 क गायत्री हर्षवर्धन पवार, 16 ड उल्हास दत्तात्रय तुपे, 40 ड दशरथ पंढरीनाथ, काळभोर किंवा गंगाधर विठ्ठल बधे, 11 क वैशाली राजेंद्र मराठे यांच्या नावाचा समावेश होता. विशेष म्हणजे या यादीतील एक नाव भाजपला अक्षरश: डिवचणारे होते. प्रभाग क्रमांक 24 ड मधून शिंदे गटाने रवींद्र धंगेकर यांच्या मुलासाठी उमेदवारी मागितली. या जागेवरून भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर हे रिंगणात आहेत. त्याच जागेवर रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर यांना उमेदवारी हवी होती. साहजिकच भाजपने या 15 जागा सोडायला नकार दिला. त्याची परिणती शिवसेना-भाजप युती तुटण्यात झाली.

आणखी वाचा

पुण्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध बिडकर सामना! 2017 ची पुनरावृत्ती होणार का? भाजप-शिवसेना आमने सामने

आणखी वाचा

Comments are closed.