राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकरांनी दिला राजीनामा; राजकीय बदनामीमुळे व्यथित होऊन न
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. समाज कंटकाकडून आपली राजकीय बदनामी केली जात असल्याचं म्हणत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक कटकारस्थान करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दीपक मानकर यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे की, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षापूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता 3-4 दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बनावट कागदपत्र फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक मानकर यांच्याकडून पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्यात आला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये माझ्या राजकीय आलेख पाहता आणि पक्षाची मजबूत स्थिती पाहता बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने राजीनामा दिल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वीच दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्र दाखवून व्यवहार केल्याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. या गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा, असे म्हणत मानकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कादगपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष राहिलेल्या शंतनू कुकडेला पुणे पोलीसांनी बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने आणि मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलीसांनी शंतनू कुकडे याच्या बँक खात्यांची पडताळणी केली. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते.
पोलिसांनी याबाबत दिपक मानकर यांना चौकशीला बोलावलं असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत, यासंबंधीची काही कागदपत्रे पोलिसांसमोर सादर केली होती. पोलिसांनी दिपक मानकरने सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्याने त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची फसवणूक केल्याबद्दल समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजीनामा पत्रात काय लिहलंय?
आपल्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मी सन 2012 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश केल्यानंतर पक्ष वाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी मी सदैव प्रामाणिक प्रयत्न केले. आपण मला विधानसभा निवडणूक 2014 मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली तेव्हापासून आजपर्यंत उपमहापौर, नगरसेवक, शहराध्यक्ष ह्या विविध पदांची जबाबदारी देऊन मला सामाजिक व राजकीय काम करण्याची संधी दिली. जुलै 2023 मध्ये झालेल्या राजकीय बदलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे विभाजन झाले व आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी क्षणाचा न विचारता मी आपल्यासारख्या भक्कम नेतृत्वासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आपणही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत दिनांक 6 जुलै 2023 रोजी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
मला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मी त्यावेळी पक्षाचे नाव व चिन्ह यांचा निर्णय होण्याअगोदर पक्षाला पाठींबा म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयात जी प्रतिज्ञापत्र द्यायची होती त्यामध्ये पुणे शहरातून मी सुमारे 9500 प्रतिज्ञापत्र गोळा करून महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे जमा केले आहेत. शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना महाराष्ट्रात नसेल इतकी मोठी जम्बो कार्यकारिणी करत फादर बॉडी, महिला, युवक, युवती, विद्यार्थी यांसह विविध सेलवर सुमारे 1500 पेक्षा जास्त पदाधिकायांची नियुक्ती करून पक्षाचे व आपले काम करण्याची संधी देत पुणे शहरात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराअंतर्गत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य, साहित्य-कला, क्रीडा, वारकरी सांप्रदाय, या विविध क्षेत्रात २०० पेक्षा जास्त कार्यक्रम घेत तळागाळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची व आपली भूमिका स्पष्टपणे पोहचवली. तसेच माझ्या माध्यमातून पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुमारे 1 लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासद नोंदणी पुस्तिकांचे आमदार, नगरसेवक, तसेच पदाधिकारी यांना वाटप करण्यात आलेले आहे. त्यातील अनेक सभासद नोंदणी पुस्तिका पक्ष कार्यालय येथे जमा झालेले आहेत. आपल्या आदेशाप्रमाणे तसेच प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सुचनेनुसार आपला पक्ष व पक्षाची विचारधारा ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुणे शहरातील सर्व घटकातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवत असून नागरिकांच्या समस्या आजही सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
मात्र माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता 3-4 दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष खा.श्री.सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे.
तरी आपणास नम्र विनंती करतो की, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा.
https://www.youtube.com/watch?v=S9AXSMFFKXG
अधिक पाहा..
Comments are closed.