मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास गंडवले

पुणे : शेअर मार्केटच्या नावाने पैशांचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दिवसेंदिवस सायबर (सायबर गुन्हे) गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच, आता पुण्यात (Pune) आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 22 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याने शेअर बाजार गुंतवणुकांमध्ये खळबळ उडाली आहे. शेअर मार्केटमध्ये (Share market) मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत, आकर्षक आणि हमखास परताव्याचे आश्वासन संबंधितांकडून देण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी तब्बल 22 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

शेअर बाजारातील गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदाराने तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून जवळपास आठ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या खात्यांवर वेळोवेळी अशाच प्रकारे इतर लोकांचे पैसे फिरवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या सायबर चोरट्यांनी आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा सखोल तपास सध्या पुणे पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा शेअर मार्केटमधील मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून केली जाणारी फसवणूक चर्चेत आली आहे.

नागरिकांनी शेअर मार्केटच्या नावाने आमिष दाखवणाऱ्यांच्या भूल थापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा

धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट

आणखी वाचा

Comments are closed.