2 लाखांवरील कर्ज फेडले तरच 2 लाखांपर्यंत कर्जमाफी!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट) योजनेतील पात्र शेतकरी लाभार्थ्यांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. या योजनेत दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. पण शेतकऱ्यांनी दोन लाखांच्या वरील स्वतःच्या हिश्श्यातून कर्जाची रक्कम भरली तरच कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने अडीच लाखांचे कर्ज घेतले असेल तर स्वतःचे पन्नास हजार रुपये भरावे लागतील आणि मगच त्याला दोन लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
या यादीत राज्यातील 1 लाख 69 हजार 820 शेतकऱ्यांचा समावेश असून संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या दोन लाख रुपयांवरील स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत 31 मार्च 2027पर्यंत भरावी लागणार आहे. या मुदतीत रक्कम भरणाऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये कर्जमाफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन टप्पे समाविष्ट आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली. त्याअंतर्गत एकूण 25 लाख 81 शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 20 लाख 72 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे.
आता योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओटीएसची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील पात्र 1 लाख 69 हजार 820 पात्र शेतकऱ्यांची यादी आज आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित याद्या बँकांच्या शाखा, विकास संस्थांच्या कार्यालयांमध्ये तसेच ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ओटीएसनुसार दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऍग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऍग्रीस्टॅक नोंदणी केली आहे, त्यांनाच आधार प्रमाणीकरणाची सुविधा मिळणार आहे. आधार प्रमाणीकरण आणि इतर पात्रता निकष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन लाख रुपयांचा लाभ हस्तांतरित केला जाईल. शासनाकडून ही रक्कम कर्ज खात्यात जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचे कर्जमुक्तीचे प्रकरण पूर्ण होणार आहे.
Comments are closed.