नागपूरचे नाव ‘दीक्षाभूमी’ करण्याच्या मागणीला जोर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नागपूरचे नाव ‘दीक्षाभूमी’ करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील सामाजिक क्रांतीची सुरुवात नागपुरातून झाली, त्यामुळे नागपूरचे नाव ‘दीक्षाभूमी’ करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव आणल्यास त्याला शिवसेना पाठिंबा देईल, ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले.

दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जाणार असे आधी सरकारने सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘प्रिंटिंग मिस्टेक’ म्हणत दादर रेल्वे स्टेशनला नव्हे तर दादर मेट्रो स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

दादर हे एक छोटं स्टेशन आहे. त्यापेक्षा नागपूरचे नाव बदला आणि दीक्षाभूमी करा, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आणावा. आम्ही सगळे त्याला पाठिंबा देऊ. त्यासाठी जर लढा झाला तर त्या लढय़ातही आम्ही सरकारच्या बाजूने उभे राहू, असे संजय राऊत म्हणाले.

बावनकुळेंनी नामांतरावर बोलणे टाळले

नागपूरची दीक्षाभूमी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. नागपुरात येणारी प्रत्येक व्यक्ती दीक्षाभूमीला भेट देते. दीक्षाभूमीच्या नावानेच नागपूरची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. दीक्षाभूमीचे महत्त्व संपूर्ण जगाला माहीत आहे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूरच्या नामांतरावर मात्र त्यांनी भाष्य केले नाही.

Comments are closed.