दोन लाखांवरील रोख जमीन व्यवहारांची माहिती इन्कम टॅक्सला देणार; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

काळा पैसा मोठय़ा प्रमाणात जमिनी आणि स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवला जातो. त्याला आता चांगलाच चाप बसणार आहे. दोन लाखांवरील जमिनीच्या व मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या रोख व्यवहारांची माहिती थेट इन्कम टॅक्सला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य शासनाने घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या मुद्रांक नोंदणी महानिरीक्षकांना यासंदर्भात तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. यापुढे अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. मालमत्तांच्या दस्त नोंदणीच्या वेळीच खरेदीची रक्कम रोख दिली की धनादेशाद्वारे याची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे.

कोणी कोणाला जमीन विकली याची माहिती मिळावी म्हणून विक्रेते आणि खरेदीदार यातील प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक व्यवहार जमा केला जाणार आहे. ही माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून इन्कम टॅक्स विभागाला दिली जाणार आहे.

दर महिन्याच्या 5 तारखेला इन्कम टॅक्सला अहवाल

राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमार्फत दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत ‘स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स’ अहवाल इन्कम टॅक्स विभागाला दिला जाणार आहे. यामुळे करचुकवेगिरीला आळा तर बसेलच, पण बेहिशेबी व्यवहारही इन्कम टॅक्सच्या निदर्शनास येतील.

Comments are closed.