IPL 2026 – चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील हार्दिकच्या निर्णयवर भडकला आर अश्विन, व्हिडीओ शेअर करत केली जोरदार टीका
वानखेडे मैदानावर गुरुवारी पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 103 धावांनी दणदणीत पराभव केला. मुंबई व चेन्नईसाठी अस्तित्वाची लढाई असलेल्या या सामन्यात मुंबईने केलेल्या सुमार कामगिरीवरून टीम इंडियाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यावर जोरदार टीका केली आहे.
गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अश्विनच्या मते, हा निर्णय मुंबईच्या पराभवाचे मुख्य कारण ठरला आहे. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील एका व्हिडिओमध्ये हार्दिकच्या रणनीतीवर सडकून टीका केली. “मी हार्दिकच्या निर्णयाने थोडा निराश झालो आहे. त्याने नाणेफेक जिंकली आणि अशा संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले जो संघ या स्पर्धेत केवळ प्रथम फलंदाजी करूनच सामने जिंकत आला आहे. मुंबईचा आरसीबी विरुद्धचा सामना आठवतोय का? याच मैदानावर २४१ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ संघर्ष करताना दिसला होता. चेन्नईविरुद्ध तर त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आणि संपूर्ण संघ अवघ्या १०४ धावांत गारद झाला.”
”आरसीबी आणि चेन्नई या दोन्ही सामन्यांच्या वेळी खेळपट्टीची परिस्थिती सारखीच होती. आरसीबीने मुंबईविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला होता, जो मुंबईला पेलवला नव्हता. चेन्नईकडे आरसीबीसारखी फलंदाजांची फळी नसली तरीही, हार्दिकने त्यांना प्रथम फलंदाजी देऊन सामन्याची सूत्रे त्यांच्या हातात सोपवली, अशी टीका अश्विनने केली.
Comments are closed.