रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री : शनिवारी राज्य सरकारकडून सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी (Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली होती. यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकमधून भाजप मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती करण्यात आली होती. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर होताच रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. यानंतर एका दिवसातच रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली असून 26 जानेवारीला रायगडमधून अदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन झेंडावंदन करणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केला होता. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत. शिंदे गटाचे भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. त्यातच रायगडमध्ये अजित पवार गटाचा एकच आमदार असूनही पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना देण्यात असल्याने शिंदे गट आक्रमक झाल्याचे दिसून आले. भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. तर नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे इच्छुक होते. नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे गेल्याने दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राज्य सरकारकडून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत स्थगिती दिली होती.
झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
आता शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, (दि. 19) रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली आहे. तथापि, भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी (दि. २६) रोजी नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन व रायगड येथे अदिती तटकरे या राष्ट्रध्वजारोहण करतील, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता रायगडमधून अदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.