10 वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रेयसीचा अचानक लग्नास नकार, नैराश्यात प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल;
रायगड क्राईम न्यूज: प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून एका तरुणाने स्वतःला संपवून घेतल्याची हृदयद्रावक घटना अलिबाग (Alibaug) शहरातील रामनाथ परिसरात उघडकीस आली आहे. अक्षय युवराज निकाळे (वय 30, मूळ रा. नाशिक) असे या युवकाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Raigad Crime News: लग्नाला नकार ठरला कारणीभूत?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय निकाळे याचे अलिबागमधील एका व्यापाऱ्याच्या मुलीसोबत मागील 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांसोबत विवाह बंधनात अडकणार होते, अशी चर्चा आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रेयसीने लग्नासाठी नकार दिल्याने अक्षयला मोठा मानसिक धक्का बसला होता. या घटनेमुळे अक्षय मागील काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता.
Raigad Crime News: राहत्या घरी टोकाचे पाऊल
नाशिक येथील एका कौटुंबिक कार्यक्रमातून अलिबागला परतल्यानंतर, अक्षयने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ प्रेयसीचा फोटो आढळल्याने प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून ही घटना घडल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
Raigad Crime News: पोलीस तपास सुरू
या प्रकरणी अक्षयचा मित्र प्रसाद रमेश गुरव यांनी दिलेल्या माहितीवरून अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 10 वर्षांचे प्रेम आणि त्यानंतर मिळालेला नकार एका तरुणाच्या जिवावर बेतल्याने अलिबागमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.