एकनाथ शिंदेंचा मोहरा सुनील तटकरेंच्या भेटीला, रायगडमध्ये कोण सत्तेत? कोण विरोधात?
रायगड झेडपी निवडणूक मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा निकाल 9 फेब्रुवारीला लागल्यानंतर आतापर्यंत एकाही जिल्हा परिषदेत अध्यक्ष निवड झालेली नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. मात्र, राज्यात महायुतीमधील घटकपक्ष जिल्हा परिषद निवडणुकीत आमने सामने आले होते. आता जिल्हा परिषदांमध्ये कोणत्या पक्षाचे अध्यक्ष विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे राष्ट्रवादी आणि भाजपचे सत्ता स्थापन करणार असं चित्र असताना आता शिवसेनेची देखील सत्ता स्थापनेत उडी घेतली आहे.
रायगडमध्ये कोण सत्तेत कोण विरोधात?
सध्या सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले उमेदवार गोव्यात ठेवण्यात आले आहेत. या दरम्यान शिवसेनेचे उदय सामंत सुनील तटकरे यांच्या भेटीला पोहचले असल्याने रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात सुनील तटकरे आणि उदय सामंत यांच्यात बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या 59 इतकी आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सर्वाधिक 21 जागा जिंकल्या मात्र ते बहुमतापासून दूर राहिले आहेत. दुसरीकडे रायगड जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं मिळून बहुमताची मॅजिक फिगर पार केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 16 आणि 15 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन शिवसेनेला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करू शकतात, अशी परिस्थिती आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक 21 जागा निवडून आणल्या.मात्र, असं असलं तरी रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी भाजप 15 ,अजित दादांची राष्ट्रवादी 16 जागांवर विजयी झाली आहे.त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी लागणारे बहुमत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.अशातच ठाकरेंची शिवसेना देखील आपले निवडून आलेले सदस्य घेऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत आणि सुनील तटकरे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसंदर्भात स्थानिक नेत्यांकडून वरिष्ठ नेत्यांकडे बोट दाखवलं जात आहे. त्यामुळं अंतिम निर्णय नेमका काय होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल: पक्षीय बलाबल
शिवसेना – 21
राष्ट्रवादी काँग्रेस – 16
भाजप – 15
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे -05
काँग्रेस – 02
एकूण – 59
आणखी वाचा
Comments are closed.