… तर तुमची अटक होईल, राज ठाकरेंचं भाषणातून सरकारला चॅलेंज; गृहमंत्री फडणवीसाचं प्रत्युत्तर
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडमधील आपल्या भाषणात शेकापचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांचं कौतुक करताना येथील शेतकरी व कामगारांना मोलाचा सल्ला दिला. तसेच, येथील उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत, अन् अमराठी कामगारांना नोकरी दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, राज ठाकरेंनी शासनाच्या धोरणावर टीका करताना जनसुरक्षा कायद्यावरुन टोलाही लगावला. आता काय तो कायदा आणला म्हणे, अर्बन नक्षल म्हणून अटक करणार, पण अटक करुनच दाखवा, असे चॅलेंजच राज ठाकरेंनी दिले. त्यावर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल, असे फडणवीसांनी म्हटले.
राज ठाकरेंनी जनसुरक्षा कायद्यावरुन केलेल्या टीकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्ही कार्यकर्त्यांना अटक करुन दाखवाच? असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. त्यांच्याकरिता हा कायदा बनलाच नाही, तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल, तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही तर तुमची अटक करण्याचे कारण नाही, असे म्हणत राज ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्त्युत्तर दिले. तसेच, जे लोक कायद्याच्या विरोधात, त्यांच्याकरिता तो कायदा आहे, आंदोलकांच्या विरोधात हा कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलण्याची मुभा आहे, त्यामुळे मला असं वाटतं ज्या कमेंट्स आहेत ते कायदा न वाचता केलेल्या कमेंट्स आहेत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला.
मराठीसोबत आणखी एक भाषा शिकावी – फडणवीस
मराठी भाषेसंदर्भाने बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझं अतिशय पक्क मत आहे, महाराष्ट्रात मराठी शिकली पाहिजे. ती अनिवार्य असली पाहिजे, ती अनिवार्य आपण केलीच आहे. पण, महाराष्ट्रातील मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात काय वावगे आहे. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेंच्या पायघड्या घालायच्या त्या मानसिकतेला माझा विरोध आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी केलेल्या मराठी भाषेच्या टीकेवरूनही मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला.
काय म्हणाले होते राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले, सर्व जमिनी आणि याच्यावरती काय तर म्हणे राज्य सरकारने कायदा आणला आहेत. तुम्ही कोण आहात तर तुम्ही अर्बन नक्षल आहात. शहरांमध्ये राहणारे नक्षल. तुम्ही जर कशाला विरोध केला, कुठल्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते, एकदा करूच देत असे म्हणत राज ठाकरेंनी जनसुरक्षा कायद्यावरुन सरकारला इशारा दिला. तसेच, या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मानसन्मान ठेवूनच ते उद्योग इथे आणावे लागतील. त्याशिवाय तुम्हाला ते आणता येणार नाहीत. कोण कुठे येतो आणि काहीही करतो, पत्ताच लागत नाही. या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून रस्ते निघणार आहेत, काय निघणार आहेत, फक्त मंत्र्यांना माहिती आहेत. का? तेच ठरवणार का? आणि रस्ता व्हायच्या आधीच तेच तिथल्या जमिनी घेणार आणि मग या सर्व उद्योगपतींची व्यवहार करणार आणि निवडणुकीच्या तोंडावरती आपल्याला गप्प बसवणार. विषय गेला बाजूला, विचार केला बाजूला, तुमच्या तोंडावरती फक्त पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडून मत घेणार. एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. कोणी खोलात जाऊन बघायला तयार नाही. कोणी खोलात जाऊन विचार करायला तयार नाही. याच्यापुढे आपलं काय होणार असे पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
नागपूरचे लोकं बुद्धीबळात फार हुशार, दिव्याचा सत्कार; फडणवीसांनी सांगितला मंत्रिंडळातील मजेशीर किस्सा
आणखी वाचा
Comments are closed.