Ratnagiri News – उद्यमनगरातील तारा वैभव रेसिडेन्सीत पहाटे चोरट्यांचा थरार; दोन बंद फ्लॅट फोडले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरीतील उद्यमनगर परिसरातील तारा वैभव रेसिडेन्सिमध्ये बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली. या इमारतीमधील दोन बंद फ्लॅटचे टाळे तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज लांबवला. चोरी करून पळून जात असताना वॉचमनने त्यांना हटकले तेव्हा चोरट्यांनी थेट वॉचमनवर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन चोरटे तारा वैभव रेसिडेन्सिच्या परिसरात संशयास्पद हालचाली करत दाखल झाले. त्यांनी इमारतीमधील दोन बंद फ्लॅटची कुलूपे तोडून आत प्रवेश केला. दोन्ही फ्लॅटमधील कपाटं उघडून चोरट्यांनी घरातील सोन्या-नाण्याच्या दागिन्यांवर आणि रोख रकमेवर डल्ला मारला. चोरीचे हे कृत्य आटोपून दोघेही चोरटे बाहेर पडत असताना, इमारतीची पाहणी करत असलेल्या सतर्क वॉचमनच्या नजरेस ते पडले.

पहाटेच्या वेळी संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या त्या दोघांना वॉचमनने हटकले आणि त्यांच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीपोटी चोरट्यांनी तात्काळ आपल्याकडील हत्यारे उपसली. दोघांपैकी एकाच्या हातातील कुऱ्हाड घेऊन त्यांनी वॉचमनवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेला वॉचमन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तातडीने जवळच असलेल्या सुरक्षा केबिनमध्ये पळाला आणि आतून कडी लावून लपून बसला.

वॉचमन केबिनमध्ये गेल्याची संधी साधत चोरट्यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पहाटे घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात एकच तारांबळ उडाली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर इमारतीमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. चोरीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, फरार झालेल्या चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. रत्नागिरी शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमधून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments are closed.