महाराष्ट्रातील दोन बँकांवर RBI ची कारवाई, विविध कारणांसाठी आर्थिक दंड भरावा लागणार
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडू देशातील विविध बँकांच्या कामकाजाची तपासणी केली जाते. ज्या बँकांकडून आरबीआयच्या बँकिंग संदर्भातील नियमांचं आणि निर्देशांचं पालन न करणाऱ्यांवर विविध प्रकारची कारवाई केली जाते. काही बँकांना आर्थिक स्वरुपात दंड ठोठावला जातो. आरबीआयनं 17 जुलै रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकांनुसार महाराष्ट्रातील दोन बँकांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे. गुजरात राज्यातील दोन बँकांना देखील दंड ठोठावण्यात आला. महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, ठाणे आणि द लक्ष्मी विष्णू सहकारी बँक लिमिटेड या दोन बँकांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 14 जुलैच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2.10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयनं केवायसी संदर्भात दिलेल्या निर्देशांची पूर्तता न केल्यानं ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2.10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नाबार्डनं ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचं 31 मार्च 2024 च्या आर्थिक स्थितीचं परिक्षण केलं होतं. त्यामध्ये आरबीआयच्या काही निर्देशांची पूर्तता केली गेली नसल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आरबीआयनं बँकेला नोटीस दिलं होतं. त्यानुसार बँकेला त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केवायसीच्या अपडेशन संदर्भातील नियमित यंत्रणेची पूर्तता करण्यात अपयश आलं, असं आरबीआयनं म्हटलं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 14 जुलैच्या आदेशानं द लक्ष्मी विष्णू सहकारी बँक लिमिटेड, इचलकरंजी वर 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या लोन्स अँड अँडव्हान्सेस टू डायरेक्टर्स, देअर रिलेटिव्हस अँड फर्म्स, कन्सर्स इन विच दे आर इंटरेस्टेड यासंदर्भातील निर्देशांची पूर्तता न केल्यानं दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयकडून बँकेच्या 31 मार्च 2024 च्या आर्थिक स्थितीची तपासणी करण्यात आली होती. बँकेनं त्यांच्या एका संचालकाला कर्ज दिलं होतं असा निष्कर्ष आरबीआयनं काढला आहे.
आरबीआयनं गुजरातमधील सर्वोदय नागरिक सहकारी बँक लिमिटेड हिम्मतनगर जिल्हा सबरकंठा बँकेवर 3 लाखांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या शहरी भागातील अर्बन बँकांच्या सायबर सुरक्षेसंदर्भातील निर्देशांची पूर्तता न केल्यानं दंड आकारण्यात आला आहे.
गुजरातमधील द मांडवी नागरिक सहकारी बँक लिमिटेड, मांडवी, जिल्हा सुरत या बंकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड आरबीआयच्या मॅनेजमेंट ऑफ अॅडव्हान्सेस -यूसीबीएसची पूर्तता न केल्यानं दंड ठोठावण्यात आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.